अबुजा (नायजेरिया) : आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. आई-वडील, पती किंवा पत्नी, मुलं यांच्यावरील प्रेमापुढे कोट्यवधींची मालमत्ताही गौण ठरते, असं म्हटलं जातं. नायजेरियातील एका तरुणाने हे खरं ठरवून दाखवलं. त्याने चक्क आपल्या वडिलांचं पार्थिव कफनाऐवजी बीएमडब्ल्यू कंपनीच्या कारमध्ये पुरलं.

फेसबुकवर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये आझुबुईके नावाच्या तरुणाने वडिलांचं पार्थिव बीएमडब्ल्यूच्या लक्झुरिअस एसयूव्हीमध्ये पुरल्याचं दिसत आहे. नायजेरिया देशातील मोसीमधल्या इहाईआला एलजीए या गावातली ही घटना आहे.

फोटोनुसार ही गाडी BMW X6 क्रॉसओव्हर असल्याचा अंदाज बांधला जात आहे. या कारची सध्याची किंमत 85 हजार डॉलर म्हणजे अंदाजे 57 लाख रुपये असल्याची माहिती आहे. भारतात तर बीएमडब्ल्यू कंपनीच्या X6 क्रॉसओव्हर कारची किंमत 1.08 कोटींपासून सुरु होते.

फेसबुक फोटोवर काही जणांनी कौतुक केलं आहे, तर कोणी टीकेची झोड उठवली आहे. कफनाऐवजी आलिशान कारमध्ये मृतदेह पुरणं हा पैशांचा अपव्यय असल्याची टीका काही जणांनी केली आहे, तर पालकांना जिवंतपणी गाडीतून फिरवा, मृत्यूनंतर सन्मानाने कफनात पुरवा, शो-ऑफ करु नका, असा सल्लाही कोणी दिला आहे.