Somalia Blast : सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये (Mogadishu) झालेल्या दोन कार बॉम्बस्फोटात (Somalia Bomb Blast) किमान 100 जण ठार झाले आहेत. सोमालियातील (Somalia News) शिक्षण मंत्रालयाबाहेर ही घटना घडली. सोमालियाचे अध्यक्ष हसन शेख यांनी एका निवेदनात या वृत्ताला दुजोरा दिला असून या घटनेत आतापर्यंत 300 लोक जखमी झाले आहेत.


सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये शनिवारी, 29 ऑक्टोबर रोजी दोन कार बॉम्बस्फोट झाले. ज्यात 30 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. तर आता मृतांची संख्या 100 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर या हल्ल्याची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेनं स्वीकारलेली नाही.


राष्ट्रपतींनी या दहशतवादी संघटनेला जबाबदार असल्याचं सांगितलं 


अध्यक्ष हसन शेख महमूद यांनी दहशतवादी संघटना अल-शबाबला जबाबदार धरत या हल्ल्याला भ्याड म्हटलं आहे. दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलण्यासाठी देशाचे राष्ट्रपती सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत असताना हा हल्ला झाला आहे. 


सोमालियाच्या राष्ट्रीय वृत्तसंस्थेनुसार, पोलीस प्रवक्ते सादिक दोडिशे यांनी सांगितलं की, दोन कार बॉम्बस्फोट झाले. असोसिएटेड प्रेसच्या पत्रकारांना घटनास्थळावरून अनेक मृतदेह सापडले. अमेन रुग्णवाहिका सेवेच्या संचालकांनी एपी वृत्तसंस्थेला सांगितलं की, त्यांनी अनेक जखमी किंवा ठार झालेले लोक गोळा केले आहेत. अब्दुल कादिर अदेन यांनी ट्वीटमध्ये सांगितलं की, दुसऱ्या स्फोटात एक रुग्णवाहिका उद्ध्वस्त झाली.


पाच वर्षांपूर्वी याच ठिकाणी झालेला हल्ला 


रुग्णालयातील कर्मचाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर 30 जणांचे मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले, त्यात महिलांची संख्या जास्त होती. आता हा आकडा 100 वर पोहोचला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 5 वर्षांपूर्वी या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला होता. ज्यामध्ये 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.