Pakistan : पीएमएल-एनचे वरिष्ठ नेते शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांची दुसऱ्यांदा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. त्यांनी शनिवारी (दि.2) पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर रविवारी (दि.3) पाकिस्तानच्या पंतप्रधानपदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पुन्हा एकदा शाहबाज शरीफ(Shehbaz Sharif) यांचा विजय झालाय. शरिफ यांच्याशिवाय, उमर अयूब खान यांनीही पंतप्रधानपदासाठी अर्ज केला होत. मात्र, रविवारी झालेल्या निवडणुकीत उमर अयुब खान यांना पुरेसा पाठिंबा मिळू शकला नाही.
सोमवारी होणार शपथविधी सोहळा
पीएमएल-एनने पीपीपी आणि एमक्यूएमसोबत आघाडी करून सरकार स्थापन केले आहे. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे भाऊ आहेत. शहबाज शरीफ हे एप्रिल 2022 ते ऑगस्ट 2023 पर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधानही राहिले आहेत. त्यावेळीही त्यांनी पीपीपीसोबत आघाडी करुन सत्ता स्थापन केली होती. तुरुंगवास भोगत असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे उमेदवार उमर अयुब खान यांना 92 मते मिळाली. यावेळी पीटीआय समर्थक खासदारांनी घोषणाबाजी केली. शाहबाज शरीफ यांचा शपथविधी सोहळा सोमवारी राष्ट्रपती भवनात होणार आहे.
शाहबाज शरीफ यांना किती मतं मिळाली?
पंतप्रधान म्हणून निवडून येण्यासाठी शाहबाज शरीफ यांना 336 सदस्यीय सिनेटमध्ये 169 मतांची गरज होती. शाहबाज शरीफ यांनी हा आकडा सहजरित्या गाठला. पीएमएल-एन आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांचे संयुक्त उमेदवार शाहबाज यांना 336 सदस्यांच्या सभागृहात 201 मते मिळाली. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे 33 वे पंतप्रधान आहेत.
पीएमएल-एनचे प्रमुख नवाझ शरीफ गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान होण्याच्या आशेने तब्बल चार वर्षांनी पाकिस्तानात परतले. आपल्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल आणि ते चौथ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान होतील, अशी आशा नवाझ शरीफ यांना होती. तथापि, 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पीएमएल-एनला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्या पक्षाने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांना 90 पेक्षा जास्त जागा जिंकण्यात यश आले. तर पीएमएल-एनला 75 तर पीपीपीने 54 जागा जिंकल्या.
स्पष्ट बहुमत न मिळाल्याने पीएमएल-एनने बिलावल भुट्टो झरदारी यांच्या पीपीपी पक्षासोबत आघाडी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट पाकिस्तान आणि इस्तेहकाम-ए-पाकिस्तान पार्टीचाही या आघाडीत समावेश आहे. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे 33 वे पंतप्रधान आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या