इस्लामाबाद : भ्रष्टाचाराच्या आरोपात नवाज शरीफ यांची खुर्ची गेल्यानंतर आता शाहिद खकन अब्बासी हे पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. आज पाकिस्तानच्या संसदेत पीएमएल (एन) च्या शाहिद अब्बासी यांना 221 मतं मिळाली. पण त्यांची ही निवड फक्त 45 दिवसांसाठी झाली आहे.
पाकिस्तानच्या संसदेत 342 सीट आहेत. 172 ही मॅजिक फिगर आहे. पीएमएमलकडे 188 जागा आहेत. तसेच इतर पक्षांचा जागा मिळून त्यांच्या आकडा 209 पर्यंत जातो. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता.
शाहिद अब्बासी हे पाकिस्तानचे 45 दिवसांसाठी काळजीवाहू पंतप्रधान असणार आहेत. नवाज शरीफ यांचे लहान भाऊ शाहबाज शरीफ हे पुढील पंतप्रधान असणार आहेत. पण पाकिस्तानमधील पंजाब प्रांताचे ते मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ते संसदेचे सदस्य नाहीत. त्यांना 45 दिवसांमध्ये पोटनिवडणूक लढवून संसदेत जावं लागणार आहे. त्यानंतरच त्यांची पंतप्रधानपदी निवड होईल. तोवर पाकिस्तानचा कारभार शाहिद अब्बासी हे पाहतील.
कोण आहेत शाहिद अब्बासी?
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद अब्बासी हे पाकिस्तानमधील श्रीमंत नेत्यांपैकी एक आहेत. पाकिस्तानमधील मोठे हॉटेल व्यवसायिक अशी त्यांची ओळख आहे. तसेच आयएसआयचे माजी चीफ मुहम्मद अब्बासी यांचे ते जावई आहेत. तसेच पाकिस्तानची खासगी विमान वाहतूक कंपनी एअरब्ल्यूचे ते मालक आहेत. नवाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळात ते पेट्रोलिअम मंत्री होते.
पनाम पेपर लीकप्रकरणी पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टानं नवाज शरीफ यांना पंतप्रधानपदावरुन हटवलं होतं. त्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी सुरु आहेत.