डब्लिन (आयर्लंड) : युरोपमधील आयर्लंड देशात गर्भपातावरील बंदी उठण्याच्या दिशेने सकारात्मक पावलं पडत आहेत. ही बंदी उठण्यामागे भारतीय वंशाच्या सविता हलप्पनवारच्या मृत्यूनंतर उभी राहिलेली चळवळ कारणीभूत आहे. सविताच्या सन्मानार्थ आयर्लंडमधील महिलांनी तिच्या नावाचा जयघोष केला.


गर्भपात कायद्यातील सुधारणांच्या मुद्द्यावर शुक्रवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत जनतेने अबॉर्शनवरील बंदी उठवण्याच्या बाजूने कौल दिला.

आयर्लंडचे भारतीय वंशाचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी सार्वमताच्या प्राथमिक निकालाची घोषणा केली. 66 टक्के मतदारांनी गर्भपातविषयक कायदे बदलण्याच्या बाजूने मत दिलं. त्यामुळे आयर्लंड सरकारला गर्भपाताला मंजुरी देणारी घटनादुरुस्ती करण्यासाठी विधेयक संसदेत मांडता येईल.


पंतप्रधान वराडकर यांनी कायमच गर्भपात कायद्यांमध्ये सुधारणांच्या बाजूने भूमिका घेतली होती. वर्षअखेरपर्यंत गर्भपाताविषयक नवीन कायदा अस्तित्वात येईल. या कायद्यानुसार पहिल्या बाराव्या आठवड्यात आणि काही परिस्थितींमध्ये 24 व्या आठवड्यापर्यंत गर्भपाताला परवानगी देण्यात येईल.

कट्टर कॅथलिक आयर्लंडमध्ये सध्याचे गर्भपातविषयक कायदे अत्यंत कडक आहेत. महिलेच्या जीवाला धोका असल्याचा अपवाद वगळता कुठल्याही परिस्थितीत गर्भपात करण्यास बंदी आहे.

या कारणामुळे 2012 मध्ये सविता हलप्पनवार या भारतीय डॉक्टरला प्राण गमवावे लागले होते. प्रेग्नंसीतील गुंतागुंतीनंतरही गर्भपात करण्यास मंजुरी न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. यानंतर गर्भपात कायद्यात बदल करण्यासाठी आयर्लंडमध्ये चळवळ उभी राहिली होती.