Russia Bomb Attack on School: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही आहे. अशा परिस्थितीत दिवसेंदिवस दोन्ही बाजूनी सैनिक आणि नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. अशातच आता रशियाने पूर्व युक्रेनवर बॉम्बहल्ला केला आहे. या बॉम्बस्फोटाचा एका शाळेलाही फटका बसला असून त्यात किमान 60 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. लुहान्स्कचे गव्हर्नर सेर्ही हैदाई यांनी ही माहिती दिली आहे. रशियन सैन्याने पूर्व युक्रेनमधील बिलोहोरीयेव्का गावात हा हल्ला केला आहे. गव्हर्नर हौदाई यांनी सांगितले की, रशियाने ज्या शाळेवर हल्ला केला, तेथे सुमारे 90 लोकांनी आश्रय घेतला होता. त्यापैकी 30 जणांना वाचवण्यात यश आले आहे.


गव्हर्नर हौदाई म्हणाले की, सुमारे 4 तासांच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात आली, त्यानंतर ढिगारा हटवण्यात आला, दुर्दैवाने तेथे दोन मृतदेह सापडले. त्यांनी सांगितले की, ढिगाऱ्याखालून 30 जणांना बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी 7 जण जखमी झाले आहेत. शाळेच्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 60 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तत्पूर्वी युक्रेन आणि पाश्चिमात्य देशांनी रशियावर नागरिकांना लक्ष्य करून युद्ध गुन्हे केल्याचा आरोप केला आहे. त्याचवेळी रशियाने हे दावे फेटाळून लावले आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत आणि लाखो लोक बेघर झाले आहेत.


युक्रेनमध्ये काय आहे सध्या परिस्तिथी आहे?


दोन महिन्यांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या या युद्धात यश न मिळाल्याने वैतागलेल्या रशियन सैन्याने आता पूर्व युक्रेनला लक्ष्य केले आहे. रशियाने येथे हजारो सैनिक तैनात केले आहेत. हे सैनिक पूर्व युक्रेनमधील शहरांवर सातत्याने हल्ले करत आहेत. रविवारी रशियन सैन्याने Donetsk आणि होल्मिव्हस्की शहरांवरही हल्ले केले. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्येच युक्रेनचे सैन्यही रशियाविरुद्ध जोरदार लढा देत आहे.


महत्त्वाच्या बातम्या