Russia Ukraine War : सध्या संपूर्ण जगाचं लक्ष युरोपकडे लागलं आहे. रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) मध्ये सुरु असलेल्या युद्धामुळं संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांशी गैरवर्तन केलं जात असल्याच्या चर्चा होत आहेत. यासंदर्भात काही व्हिडीओही व्हायरल होत आहेत. यासर्व प्रकारांबाबत युक्रेनच्या राजदुतांनी स्पष्टीकरण दिलं आहे. युक्रेन कोणाशीबी भेदभाव करत नाही, असं ते म्हणाले आहेत. तसेच, युक्रेनसाठी सर्व देशांचे नागरिक समान असून सर्व भारतीयांना सुखरुप मायदेशी पाठवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचंही ते म्हणाले आहेत. 


युक्रेनचे राजदूत इगोर पोलिखा यांनी राजधानी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना रशियाचा हल्ला ही मोठी शोकांतिका असल्याचं सांगितलं आहे. रशियन बॉम्ब आणि क्षेपणास्त्रं संपूर्ण युक्रेनवर पडत आहेत. अशा परिस्थितीत हजारो लोक युक्रेन सोडून शेजारील युरोपीय देशांमध्ये पोहोचत आहेत. सीमा रक्षकांनी निर्वासितांशी गैरवर्तन केल्याच्या काही घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत सर्व निर्वासितांनी शिस्त पाळणं अत्यंत आवश्यक आहे. युक्रेनसाठी सर्व देशांचे नागरिक समान आहेत. त्याच्या दूतावासात तैनात असलेल्या सैन्य-संलग्नाची पत्नी आणि दोन लहान मुले युक्रेनच्या सीमेवर अडकले आहेत.


युक्रेनमध्ये भारतीयांसोबत भेदभाव? व्हिडीओ व्हायरल 


पोलंड आणि इतर देशांच्या सीमेवर युक्रेनच्या सीमेवरील काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते. ज्यामध्ये युक्रेनचे सैनिक शिवीगाळ करताना आणि हवेत गोळीबार करताना दिसत होते. युक्रेनचे सैनिक सीमा ओलांडताना भेदभाव करत असल्याचा आरोप काही लोकांनी केला होता. काही व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये भारतीयही दिसले होते. यामुळेच दिल्लीतील युक्रेनच्या राजदूताला या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करावा लागला. 


पोलिखा म्हणाले की, आपला देश आक्रमकतेचा बळी आहे. त्यामुळे या निर्वासित-संकटासाठी त्यांना दोष देता येणार नाही. या संकटातून जर कोणाची सुटका होऊ शकली असेल, तर ते दुसरं कोणी नसून रशियाचे अध्यक्ष पुतिन आहेत. कारण या संकटाचं मूळ रशिया आहे. राजदूत म्हणाले की, हा युद्धाचा काळ आहे आणि युक्रेनमध्ये एक अतिशय गंभीर संकट येत आहे. अशी मानवी शोकांतिका भारतानं फाळणीच्या काळात पाहिली आहे. मात्र युक्रेन भारताला कोणत्याही परिस्थितीत मदत करण्यास तयार आहे. त्यासाठी खुद्द भारताच्या परराष्ट्र सचिवांनी एक दिवस आधीच त्यांची भेट घेतली होती.


पाहा व्हिडीओ : Why Indian Students Visit Ukraine : डॉक्टर होण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांची पसंती युक्रेनलाच का?



आतापर्यंत रशियाचे 5300 सैनिकांचा मृत्यू 


पत्रकार परिषदेदरम्यान राजदूत पोलिखा यांनी आपल्या देशातील परिस्थितीची माहिती दिली आणि रशियन सैन्य निवासी भाग, शाळा, बालवाडी, संग्रहालयं आणि अनाथाश्रम यांना कसे लक्ष्य करत आहे ते सांगितलं. रशियन क्षेपणास्त्र आणि बॉम्ब हल्ल्यांमध्ये लहान मुलंही मारली गेल्याचं त्यांनी सांगितलं. पण युक्रेनचे सैनिक चोख प्रत्युत्तर देत आहेत. आतापर्यंत 5300 रशियन सैनिक मारले गेले आहेत आणि कित्येक युद्धकैदी करण्यात आले आहेत, असा दावा त्यांनी केलाय. रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे रशियाचे परराष्ट्र मंत्री संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीला जाऊ शकले नाहीत. कारण बहुतेक देशांनी रशियन विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद केलं आहे. रशियाची आर्थिक स्थितीही ढासळू लागली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha