Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाचा आज सातवा दिवस आहे. या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूचे हजारो सैनिकी मारले गेले आहेत. तर अनेक युक्रेनच्या नागरिकांनाही आपला प्राण गमवावा लागला आहे. या युद्धामुळे दहशतीत असलेले हजारो युक्रेनचे नागरिक आता देश सोडून इतर देशांमध्ये स्थलांतरित होत आहेत. युक्रेनच्या नागरिकांची अवस्था पाहून आता रशियामध्येच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात नागरिक निदर्शन करताना दिसत आहेत. हे युद्ध थांबवावे म्हणून अनेक रशियन नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. 


मॉस्कोतही पुतीन यांच्या विरोधात बंडाचा सूर 


रशियाने हे युद्ध थांबवावे म्हणून अमेरिकासह युरोपियन देशांनी रशियाची आर्थिक कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. जगभरातील अनेक देश या युद्धासाठी पुतीन यांना दोष देत असून हे युद्ध थांबवण्याची मागणी करत आहेत. मात्र या सर्व विरोधाला न जुमानता पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला सुरूच ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अशातच आता रशियातच त्यांच्याविरोधात आवाज उठायला सुरुवात झाली आहे. मॉस्कोतील खामोव्हनिकी जिल्ह्यातील नगरपरिषदेने या युद्धाविरोधात पुतीन यांचा निषेध केला आहे. यूक्रेनवरील हल्ला हा अन्यायकारक, अमानवीय आणि वेडेपणाचा असल्याची भावना खामोव्हनिकी जिल्ह्यातील नगरपरिषदेने व्यक्त केली आहे.


रशियात अनेक ठिकाणी युद्धविरोधी रॅली


रशियातील अनेक शहरात यूक्रेनविरोधात सुरू असलेल्या युद्धाविरोधात रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागात घेत आहेत. रॅली काढल्याने रशियन पोलिसांनी कारवाई करत हजारो नागरिकांना ताब्यात घेतलं आहे. तसेच युद्धात रशियाविरोधी बातम्या दाखवल्याने रशियन सरकारकडून टीव्ही रेन आणि इको ऑफ मॉस्कोवर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित संस्थेच्या म्हणण्यानुसार, रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमधील सुमारे सहा लाख साठ हजार नागरिकांनी शेजारच्या देशांमध्ये आश्रय घेतला आहे. युक्रेनमधील लोक युद्धाच्या काळात पोलंड, रोमानिया, स्लोव्हाकिया आणि हंगेरी येथे स्थलांतरित होत आहेत. हे देश युक्रेनच्या सीमेला लागून आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: