Joe Biden Speech : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकेच्या संसदेला आज संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात रशियावर हल्लाबोल करताना युक्रेनच्या नागरिकांच्या लढाऊ वृत्तीचे कौतुक केले. मात्र, आपल्या भाषणात बायडन यांची जीभ घसरली. त्यांनी युक्रेनच्या नागरिकांना इराणचे नागरिक असे संबोधले. (Biden Called Ukrainians as Iranian people)


बायडन यांनी आपल्या भाषणात पुतीन यांच्यावर टीका केली. बायडन म्हणाले की, पुतीन कीव्हला रणगाड्यांसह वेढा घालू शकतील, पण ते 'इराणी' नागरिकांचे मन जिंकू शकत नाही, असे बायडन यांनी म्हटले. बायडन यांना इराणी ऐवजी युक्रेनियन असे म्हणायचे होते. मात्र, त्यांची जीभ घसरली. 


बायडन यांच्या भाषणानंतर ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर 'इराणी' हा शब्द ट्रेंड होऊ लागला. 


बायडन यांनी आपल्या भाषणात काय म्हटले?


रशियाने युक्रेनवरील हल्ले आणखी तीव्र केले असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेच्या 'स्टेट ऑफ द युनियन'ला संबोधित करताना त्यांनी रशियावर जोरदार टीका केली. युक्रेनवर हल्ला करून पुतीन यांनी घोडचूक केली आहे. रशियाची आणखी आर्थिक कोंडी करणार असून अमेरिकेची हवाई हद्द रशियासाठी बंद करण्यात आल्याची घोषणा बायडन यांनी केली आहे. युक्रेनवर अमेरिकेचे सैन्य उतरवण्याबाबत त्यांनी सूचक वक्तव्य केले. आपल्या भाषणात जो बायडन यांनी युक्रेनचे कौतुक केले. रशियाने युक्रेनकडून एवढ्या मोठ्या प्रतिकाराची अपेक्षाच केली नसणार असेही बायडन यांनी म्हटले. 


रशियाने पुकारलेल्या युद्धाची किंमत त्यांना मोजावी लागणार आहे. आम्ही रशियावर आर्थिक निर्बंध लागू करत आहोत असे बायडन यांनी सांगितले. फक्त अमेरिकाच नव्हे तर जगातील इतर  अनेक देश युक्रेनसोबत उभे असल्याचे त्यांनी म्हटले. अमेरिकेने रशियाची हवाई हद्द बंद केली असल्याची घोषणा त्यांनी केली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha