Russia Ukraine War Highlights : रशिया आणि युक्रेनमध्ये घनघोर युद्ध सुरू आहे. रशियन फौजा युक्रेनची राजधानी कीवजवळ पोहचल्या आहेत. काही तासांमध्ये रशियन फौजा कीववर ताबा मिळवू शकतात, अशीदेखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे युक्रेन आणि जागतिक राजकारणाच्यादृष्टीने आगामी काही तास महत्त्वाचे ठरणार आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने केलेल्या दाव्यानुसार जवळपास 800 रशियन सैन्य ठार झाले आहेत. युद्धाच्या पहिल्या दिवशी युक्रेनच्या 137 जणांना प्राण गमवावे लागले. यामध्ये सैन्य आणि नागरिकांचा समावेश आहे.
आतापर्यंतच्या प्रमुख घडामोडी :
- युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी सकाळी उपमंत्री हाना मल्यार यांचा हवाला देत 800 रशियन सैनिक मारल्याचा दावा केला. एका अधिकृत ट्विटद्वारे मंत्रालयाने म्हटले आहे की, युक्रेनने 7 रशियन विमाने, हेलिकॉप्टर, 30 हून अधिक रणगाडे, 130 हून अधिक बीबीएम नष्ट केले आहेत.
- युक्रेनची राजधानी कीवमध्ये शुक्रवारी पहाटे दोन मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियन सैन्य राजधानीजवळ आले आहेत. रशियन फौजांनी नागरी वस्तींवर गोळीबार केल्याचे युक्रेनच्या लष्कराने म्हटले. त्याशिवाय एअर डिफेन्स सिस्टिमने रशियाचे दोन घातक हल्ले परतवले असल्याचे म्हटले.
- रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की त्यांच्या सैन्याने युक्रेनमधील 11 एअरफील्डसह 70 हून अधिक लष्करी तळ नष्ट केले आहेत. युक्रेनचे लष्करी हेलिकॉप्टर आणि चार ड्रोनही पाडण्यात आल्याची माहिती रशियाने दिली.
- रशियासोबत दोन हात करण्यासाठी आम्हाला एकटं सोडण्यात आलं असल्याचे युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमीर झेलन्सकी (Volodymyr Zelenskyy) यांनी म्हटले. झेलन्सकी यांनी देशाला संबोधित करणारा एक व्हिडिओ मेसेज प्रसिद्ध केला आहे. या युद्धात जगाकडूनही युक्रेनला मदत मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या बाजूने लढण्यासाठी कोण उभं आहे? मला एकही देश युक्रेनच्या बाजूने दिसत नाही. युक्रेनला नाटोचं सदस्यत्व देण्याची हमी कोण देण्यास तयार आहे? प्रत्येकजण घाबरत असल्याचे त्यांनी सांगितले.
- ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी गुरुवारी रशियावर नव्या आर्थिक निर्बंधांची घोषणा केली. त्यांनी संसदेत युक्रेनवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पुढील निर्बंधांनुसार, रशियन बँकांना लंडनच्या आर्थिक व्यवस्थेतून बाहेर ठेवले जाईल. ब्रिटनने यापूर्वी पाच रशियन बँका आणि पुतीन यांच्या तीन मित्र राष्ट्रांवर निर्बंध जाहीर केले होते.
- रशियन फौजांनी गुरुवारी चेर्नोबिल अणू प्रकल्पाचा ताबा मिळवला आहे. चेर्नोबिल अणू प्रकल्प हा युक्रेनची राजधानी कीवपासून 130 किमी अंतरावर आहे. एप्रिल 1986 मध्ये मोठा स्फोट झाला होता. वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, चेर्नोबिल अणू प्रकल्पात यावेळी युक्रेन आणि रशियातील अणू प्रकल्पाचा 22 हजार गोणी अणू कचरा ठेवण्यात आला आहे.
- बायडन यांनी रशियावर कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाहीतर अमेरिकेकडून रशियावर निर्यात निर्बंधही लादण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, या निर्बंधांचा मोठा फटका रशियाला बसेल, असंही बायडन म्हणाले. सोबतच रशियातील उद्योगपती आणि अब्जाधीशांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आर्थिक कोंडी करणार असल्याचा सूचक इशाराही जो बायडन यांनी दिला आहे.
- रशिया आणि युक्रेनमध्ये पेटलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे पंतप्रधान ब्लादिमीर पुतिन यांच्यामध्ये महत्वपूर्ण चर्चा झाली. नाटो सैन्य आणि रशियामध्ये असलेले मतभेद हे केवळ पारदर्शक संवादाच्या माध्यमातून सुटू शकतात असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी स्पष्ट केलं. या दोन नेत्यामध्ये जवळपास 20 ते 25 मिनिटांची चर्चा झाली.
इतर महत्त्वाच्या घडामोडी: