Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबणार की नाही, याचा निर्णय आज दुपारपर्यंत होऊ शकतो. आज बेलारूसमध्ये रशिया-युक्रेन यांच्यात चर्चा होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता ही बैठक होणार आहे. रशिया आणि युक्रेनचे शिष्टमंडळ चर्चेसाठी बेलारूसला पोहोचले आहे. बेलारूसच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एक फोटो ट्विट करून माहिती दिली आहे की, रशिया-युक्रेन बैठक आयोजित करण्यासाठी मंच तयार करण्यात आला आहे. आता फक्त दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाची प्रतीक्षा आहे.


 






 


बेलारूसवर विश्वास ठेवणे युक्रेनसाठी कठीण


बेलारूसवर विश्वास ठेवणे युक्रेनसाठी कठीण आहे. कारण रशिया-युक्रेन युद्धात आतापर्यंत बेलारूस रशियाची बाजू घेत असल्याचे दिसून आले आहे. आज सकाळी अशीही माहिती आली होती की, बेलारूस युक्रेनवर हल्ला करण्यासाठी रशियाला मदत करू शकतो. आतापर्यंत बेलारूस थेट या युद्धात समोर आला नव्हता. मात्र आज युक्रेनच्या Zhytomyr विमानतळावर झालेल्या क्षेपणास्त्राचा हल्ला हा बेलारूसच्या धर्तीवरून करण्यात आला. बेलारूसने याआधी म्हटले होते की, ते रशियाला हवाई हल्ल्यासाठी आपल्या भूभागाचा वापर करू देणार नाही, असे असतानाही हे घडले. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात युक्रेनमधील जुन्या इमारतीचेही नुकसान झाले.


भारतीयांना जिथे आहात तिथेच राहण्याच्या सूचना 


युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांना सूचना (Advisory) जारी करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या पूर्वेकडील भागात सध्या परिस्थिती वाईट असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता भारतीयांना जिथे आहात तिथेच राहण्यास सांगण्यात आले आहे. नव्या आदेशानुसार, युक्रेनमधील भारतीयांनी घाबरून न जाता स्वत:ला सुरक्षित ठेवणे आता महत्त्वाचे आहे. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि लोकांना भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगण्यात आले आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :