Ukraine Russia Conflict : रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्धाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. 24 फेब्रुवारी 2022 रोजी या दोन्ही देशांमधील संघर्षाला सुरुवात झाली असून हा संघर्ष अद्यापही कायम आहे. युक्रेन अद्यापही लढतोय, तर रशियाचा माघार घेण्यास नकार असल्याचं पाहायला मिळतंय. या युद्धामध्ये अद्याप कोणता देशाकडे झुकतं माप आहे, हे समोर आलेलं नसलं तरी या संघर्षात युक्रेनचं फार नुकसान झालं आहे. तेथील हजारो लोकांचा जीव गेला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष मिटण्याची चिन्हं अद्यापही धुसर आहेत.


युक्रेन-रशिया युद्ध कधी संपणार?


रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले तेव्हा युक्रेन रशियासमोर फार काळ टिकू शकणार नाही असं वाटत होतं, पण युक्रेनने रशियासारख्या बलाढ्य देशाला कठोर झुंज दिली. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांमध्ये नागरिकांसह हजारो सैनिकही मारले गेले. याला प्रत्युत्तर देत युक्रेननंही हजारो रशियन सैनिक मारले. यामुळे पुतिन यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. 


रशिया-युक्रेन संघर्ष आणखी चिघळणार?


दरम्यान, युनायटेड नेशन्सचे अध्यक्ष अँटोनियो गुटेरेस यांनी रशिया-युक्रेन युद्धाच्या समाप्तीच्या संभाव्यतेचा अंदाज व्यक्त केला आहे. 6 फेब्रुवारी रोजी संयुक्त राष्ट्रांच्या सभेतील भाषणात त्यांनी म्हटलं आहे की, दोन्ही देशांमधील शांततापूर्ण वातावरण तयार करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र दोन्ही देशांमधील तणाव अधिक वाढत आहे. येत्या काळात या युद्धाला अधिक हिंसक वळण लागण्याची शक्यता आहे. युद्धाचं एक वर्ष अर्थात या 12 महिन्यांमध्ये बरेच काही बदललं आहे.


युद्ध आमुचे सुरू...


गेल्या वर्षी 24 फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला आणि या युद्धाला सुरुवात झाली. रशिया महासत्ता आहे, तर युक्रेन छोटा देश असून मागे रशियाच्या आहे, त्यामुळे युद्ध रशिया जिंकेल, असा अनेकांचा कौल होता. मात्र युक्रेनने शर्थीच्या प्रयत्नांसह रशियाविरुद्ध झुंजार खेळी केली आहे. रशियाने युक्रेनवर हल्ले करत ऊर्जा आणि संसाधनांना लक्ष्य केलं. काही दिवसांनंतर रशियाच्या ताब्यातील 54 टक्के भूभाग परत मिळवण्यात युक्रेनला यश आलं. 


व्लादिमीर झेलेन्स्की यांच्यावरील लोकांचा विश्वास वाढला


युक्रेन आणि रशिया यांच्यात जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा बहुतेक लोकांनी झेलेन्स्की यांच्या नेतृत्वाच्या क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. पण वर्षभरानंतरही त्यांनी नाटो देशांच्या मदतीने रशियाला कडवी झुंज दिली आहे. यामुळे लोकांचा त्यांच्यावरील विश्वास वाढला आहे. विशेष म्हणजे जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा प्रत्येकाला असं वाटलं होतं की, रशिया सहज युद्ध जिंकेल, पण गेल्या वर्षभराचा काळ पाहता युद्धाचा रशियालाही याचा मोठा फटका बसल्याचं दिसत आहे.


जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम


युक्रेन आणि रशिया युद्धामुळे दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. रशिया मागे हटण्यास तयार नसून सातत्याने युक्रेनवर हल्ले करत आहे. तर अनेक शहरं उद्धवस्त होऊनही युक्रेनही रणांगणात खंबीरपणे उभा आहे. रशिया युक्रेन युद्धाने दोन्ही देशांवर परिणाम झाला आहे. पण त्याचसोबतच जागतिक अर्थव्यवस्थेच्या समिकरणावरही याचा परिणाम झाला आहे.


जागतिक अर्थव्यवस्थेत पुढील दोन आर्थिक वर्षात सुस्तीचे वातावरण कायम राहिल. गेल्या आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेचा जीडीपी 2.2 टक्क्यांच्या तुलनेत किंचीत वाढीसह 3.1 टक्के राहण्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी वर्तवला आहे. यंदाच्या वर्षात जागतिक अर्थव्यवस्था संपूर्णपणे आशियाई बाजारपेठेवर अवलंबून राहिल. अमेरिका आणि यूरोपमध्ये आणखीन घट होण्याची शक्यता आहे.


युद्धाचा भारतावर काय परिणाम?


रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये भारताने कायम मध्यस्थीची भूमिका घेतली आहे. भारताचे रशिया आणि युक्रेन दोन्ही देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे हा संघर्ष चर्चेने सोडवावा, अशी भारताची भूमिका राहिली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे जगभरात कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि कोळशाच्या उपलब्धतेबाबत मोठं संकट निर्माण झालं आहे. यामुळे भारतालाही आता फटका बसण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष निवळेपर्यंत भारत सरकारकडून संकटांचा सामना करण्यासाठी अल्पकालीन आणि मध्यम कालावधीसाठी धोरणात्मक उपाययोजनांवर भर देण्यात येईल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Viral Video : हदयस्पर्शी! 30 आठवड्यांनंतर गर्भवती पत्नीला भेटला युक्रेनी सैनिक, व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक