Russia Ukraine Crisis : युक्रेन आणि रशिया संघर्ष सुरु आहे.  याकडे जगाचे लक्ष लागून आहे. युद्ध थांबवून चर्चेनं मार्ग काढला जावा अशी मागणी जगभरातून होत असताना एक सकारात्मक बातमी समोर आली आहे.  रॉयटर्सच्या माहितीनुसार रशिया आणि युक्रेन सरकारनं शुक्रवारी चर्चेतून तोडगा काढण्याबाबत संकेत दिले आहेत. युक्रेन आणि रशियामध्ये चर्चेसाठी वेळ आणि स्थळ निश्चित करण्याबाबत अद्याप चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. 


दुसरीकडे किव्हमधील अधिकाऱ्यांनी आपल्या नागरिकांना आवाहन केलं आहे. दशकातील सर्वात वाईट युरोपीय सुरक्षा संकटात रशियन सैन्याला पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी आणि राजधानीचे रक्षण करण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे. 


युक्रेनचे राष्ट्रपती व्होदिमर झेलेन्स्की  यांचे प्रवक्ते सर्गेई न्याकिफोरोव यांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे की, आक्रमण सुरु झाल्यानंतर चर्चेतून मार्ग काढण्याबाबत आशेचं पहिलं किरण दिसू लागलं आहे.  सर्गेई न्याकिफोरोव यांनी फेसबुक पोस्टद्वारे म्हटलं आहे की, युक्रेन युद्धविराम आणन शांततेसाठी चर्चा करण्यासाठी तयार होतं आणि आहे. त्यांनी म्हटलं की, युक्रेन आणि रशियामध्ये चर्चेसाठी स्थळ आणि वेळ निश्चित करण्याबाबत चर्चा सुरु आहे.  


मी इथेच आहे, कीवमध्ये आहे. युक्रेनची रक्षा करण्यासाठी लढतोय- व्होदिमर झेलेन्स्की


रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी कीवच्या उंबरठ्यावर पोहोचलं असताना युक्रेनचे अध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की हे भूमिगत झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. आता त्याला पूर्णविराम मिळाला असून आपण राजधानी कीवमध्येच आहे, युक्रेनची रक्षा करतोय असा संदेश देत व्होदिमर झेलेन्स्की यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे युक्रेनने अद्याप हार मानली नाही, किंवा रशियासमोर शरणागती पत्करली नाही हे स्पष्ट झालंय. युक्रेनचे अध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. युक्रेनियन भाषेत असलेला हा व्हिडीओ 33 सेकंदांचा आहे. त्यामध्ये ते म्हणतात, मी इथेच आहे, कीवमध्ये आहे. युक्रेनची रक्षा करण्यासाठी लढतोय.



रशियाच्या हल्ल्याच्या भीतीने व्होदिमर झेलेन्स्की हे भूमिगत झाले, देश सोडून गेले अशा आशयाच्या अफवा पसरल्या जात होत्या. व्होदिमर झेलेन्स्की या ताज्या व्हिडीओमुळे त्याला आता पूर्णविराम मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, रशियाने हवाई दलाच्या माध्यमातून कीववर हल्ला सुरू ठेवला असून त्यामुळे या शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत. शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच बेसमेंट किंवा इतर भूयारांमध्ये सुरक्षित रहावं असं आवाहन युक्रेनच्या सैन्याने केलं आहे. 


युक्रेनच्या अध्यक्षांचे जगभरातील देशांना आवाहन
युक्रेनमधील लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेले सरकार उलथवून लावण्याचा आणि देशावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न रशियाचा असून त्या विरोधात जगभरातील देशांनी युक्रेनच्या मदतीला यावं असं आवाहन युक्रेनचे अध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांनी केलं आहे. तसेच अमेरिका आणि युरोपने रशियावरील आर्थिक निर्बंध हे अधिक कडक करावेत अशीही मागणी त्यांनी केली आहे. 



संबंधित बातम्या: