Russia Terrorist Attack : रशियाच्या सैन्य तळावर मोठा दहशतवादी हल्ला झाला अशऊन यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 15 जण जखमी झाले आहेत. एकीकडे रशिया आणि युक्रेनचा संघर्ष सुरु आहे. रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले सुरु आहेत. तर दुसरीकडे रशियन सैन्याच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शनिवारी रशियन सैन्याच्या तळावर मोठा हल्ला झाला आहे. या आधीच एक दिवस रशियाचे राष्ट्रपती (President of Russia) व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) नाटोला (NATO) इशारा दिला होता.


युक्रेनजवळील रशियन सैन्य तळावर हल्ला


रशियाचा संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन अज्ञात दहशतवाद्यांनी शनिवारी युक्रेनच्या सीमेजवळील रशियाच्या सैन्य तळावर गोळीबार करत हल्ला चढवला. या दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, रशियन सैन्यानेही दहशतवाद्यांवर प्रतिहल्ला चढवला. या गोळीबारात दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात रशियन सैन्याला यश आलं आहे.




रशियन संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या नैऋत्य रशियाच्या बेलगोरोड भागातील सैन्य तळावर हा हल्ला झाला. दोन दहशतवाद्यांनी गोळीबार केला. सरावादरम्यान दोन स्वयंसेवक बनून आलेल्या सैनिकांनी इतर सैनिकांवर गोळीबार केला. या गोळीबारात 11 सैनिकांचा मृत्यू झाला आणि 15 जण जखमी झाले आहेत. रशियन संरक्षण मंत्रालयाने या घटनेला दहशतवादी हल्ला म्हटलं आहे.









पुतिन यांचा नाटोला इशारा


रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी नाटोबाबत मोठं विधान करत इशारा दिला होता. रशिया आणि युक्रेनच्या संघर्षामध्ये नाटो उतरल्यास मोठा विध्वंस होईल, असं पुतिन यांनी म्हटलं होतं. पुतिन यांनी एका कार्यक्रमात बोलताना रशिया आणि युक्रेनमधील युद्धावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी नाटोला धमकी वजा इशारा दिला.