Russian Plane Crash :  युक्रेनचे 65 युद्धबंदी असलेले रशियाचे (Russia) विमान कोसळले (Plane Crash) आहे. आयएल-76 हे मालवाहतूक करणारे विमान युक्रेनच्या सीमेजवळील पश्चिम बेलग्रूड भागात कोसळले असल्याची माहिती रशियाने दिली आहे. बुधवारी हा अपघात झाला आहे. 


वृत्तसंस्था रिया-नोवोस्तीने संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, विमानात युक्रेनचे 65 युद्धबंदी होते. हे सर्वजण युक्रेन लष्कराचे कर्मचारी होते. या युद्धबंदींना बेलग्रूड येथे युक्रेन लष्कराकडे सोपवण्यासाठी नेण्यात येत होते. या युद्धबंदींसह सहा क्रू सदस्य होते. मॉस्कोतील प्रमाणवेळे सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या  अपघातात जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


या विमान अपघाताचा व्हिडीओ समोर आला असून निवासी भागाजवळ रशियन लष्कराचे विमान कोसळले असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओनुसार, पायलटने विमानावरील नियंत्रण गमावले असल्याचे दिसत आहे. हे विमान वेगाने जमिनीवर कोसळले. अपघातानंतर स्फोटाचा आवाज आला आणि  आगीचे लोळ उठले असल्याचे दिसून आले. 






रशिया आणि युक्रेनदरम्यान मागील दीड वर्षांपासून युद्ध सुरू आहे. युद्ध समाप्त झाल्याची घोषणा करण्यात आली नाही.  अद्यापही दोन्ही देशांमध्ये तोडगा निघाला नाही.