Zelensky On Russia Rebellion: रशियातील खासगी सैन्य असलेल्या वॅगनर आर्मीने (Wagner Group of Army) बंड पुकारलं आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन (Vladimir Putin) यांना धक्काच बसला. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान (Russia-Ukraine War) वॅगनर गट चर्चेत आला होता. या खासगी सैन्याची स्थापनाच पुतीन यांच्या सहमतीने करण्यात आली होती. याच वॅनगर सैन्याने वाईट काळात रशियाला धोका दिला असल्याचं पुतीन म्हणाले. या वॅगनर सैन्याचा प्रमुख येवेनगी प्रिगोझिन हा पुतीन यांचा निकटवर्तीय समजला जातो. त्यामुळे, प्रिगोझिनने रशियासोबत गद्दारी केली असून पाठीत खंजीर खुपसला असल्याचं देखील पुतीन म्हणाले. आम्ही आमच्या विरोधकांशी लढा देऊ आणि देशवासियांची सुरक्षा करू, असं पुतीन पुढे म्हणाले. दुसरीकडे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी (Zelensky) या सर्व घटनेवर वक्तव्य केलं आहे. रशियातील हुकुमशाही सरकारसमोर आता मोठा धोका निर्माण झाला आहे आणि सैन्याच्या बंडखोरीमुळे पुतीन खूप घाबरले असल्याचं झेलेन्स्की म्हणाले.


युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी ट्विटरवरुन ही प्रतिक्रिया दिली आहे. वॅगनर सैन्याने पुकारलेल्या बंडाला स्वत: पुतीन जबाबदार असल्याचं झेलेन्स्की म्हणाले.पुतीन यांनीच ही परिस्थिती स्वत:वर ओढवून घेतली असून आता ते घाबरले असल्याचं झेलेन्स्की म्हणाले.






"युक्रेनवर हल्ला करणाऱ्या पुतीन यांच्यासमोर आता मोठी समस्या"


युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी त्यांच्या देशवासियांना संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, आपल्या सर्वांना माहित असेल की, रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी 2021 मध्ये संपूर्ण जगाला कशा प्रकारे धमकी दिली होती. आपल्या ताकदीच्या जोरावर ते संपूर्ण जगाला चेतावनी देत होते. 2022 मध्ये त्यांनी युक्रेनबद्दल त्यांच्या देशातील लोकांचे कान भरले आणि त्यांच्याशी खोटं बोलून, त्यांना संभ्रमात टाकून त्यांचा पाठिंबा मिळवल्याचं झेलेन्स्की म्हणाले. आता क्रेमलिनमध्ये राहून ते कोणत्याही प्रकारच्या दहशतवाद्यांची मदत घेऊ शकतात आणि मुर्खासारखा कुठलाही निर्णय घेऊ शकतात. तरीही ते परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकत नाही आणि हीच त्यांच्यासमोरची सध्याची मोठी समस्या असल्याचं झेलेन्स्की म्हणाले.


"भाड्याने घेतलेल्या सैनिकांनीच पुतीन यांच्या पाठीत खंजीर खुपसला"


पुतीनच्या आदेशाने रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला केला होता आणि त्यावेळी एका दिवसात युक्रेनमधील लाखो लोक मारले गेले. हे सर्व करण्यासाठी रशियाने खासगी भाडोत्री सैन्याचा वापर केल्यामुळे झालं असल्याचं झेलेन्स्की म्हणाले. रशियाच्या खासगी सैन्याने मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांचा वापर केला आणि युक्रेनमध्ये दहशत निर्माण केली होती, असं झेलेन्स्की म्हणाले. आता रशियाने घेतलेल्या याच भाडोत्री सैनिकांनी रशियामध्येच खळबळ माजवली आहे आणि आता पूर्ण जग हे दृश्य बघत असल्याचं झेलेन्स्की म्हणाले.


"पुतीन घाबरुन लपून बसले"


क्रेमलिनमधील तो व्यक्ती आता प्रचंड घाबरलेला आहे आणि कुठेतरी लपून बसल्याचं म्हणत झेलेन्स्कींनी पुतीन यांच्यावर निशाणा साधला आहे. पुतीन यांनी स्वत:च स्वत:वर धोका ओढवून घेतल्याचं झेलेन्स्की म्हणाले.


"रशियाचा दहशतवाद शांतपणे सहन करू नये"


जगाने रशियाने माजवलेल्या अराजकतेला शांतपणे सामोरं जाऊ नये, असं आवाहन झेलेन्स्की यांनी केलं आहे. यावेळी जागतिक पातळीवरील नेत्यांनी घेतलेले निर्णय ऐतिहासिक ठरू शकतात आणि पत्रकारांनी लिहिलेला प्रत्येक शब्द सोन्यासारखा असल्याचं झेलेन्स्की म्हणाले. युक्रेनवर आलेल्या संकटाला जबाबदार असणाऱ्या पुतीन यांचं उघडपणे नाव घेण्याची वेळ आल्याचं झेलेन्स्की म्हणाले. अशा परिस्थितीत जगाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं आणि पुतीन या सर्व प्रकरणावर नियंत्रण मिळवण्यासाठी सक्षम आहे असं समजलं तर येणाऱ्या काळात जगापुढे धोका निर्माण होऊ शकतो, असं देखील झेलेन्स्की म्हणाले.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Russia: वॅगनर म्हणजे आहेत तरी कोण? पुतीनच्या इशाऱ्यावर काम करणारे आज त्यांच्यावर उलटले!