Wagner Rebellion : वॅगनर ग्रुपनं बंड केल्यानंतर मॉस्कोमधील परिस्थिती चिघळली आहे. अशात मॉस्कोमध्ये दहशतवादी विरोधी कायदा लागू करण्यात आली आहे. त्याशिवाय सोमवार नॉन वर्किंग दिवस असेल, असे मॉस्कोच्या महापौर सर्गेई सोबयानिन यांनी सांगितलेय. त्याशिवाय 1 जुलै 2023 पर्यंत मोठ्या प्रमाणावर मैदानी आणि शैक्षणिक संस्थांचे कार्यक्रम स्थगित केले आहेत. मॉस्को शहरात दहशतवादविरोधी नियम लागू करण्यात आला आहे. शहरातील सर्व सेवा हाय अलर्टवर असतील. लोकांना त्यांच्या घरात राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विनाकारण प्रवास करू नका, असे महापौर सर्गेई सोबयानिन यांनी सांगितलेय. 


रशियातील खासगी सैन्यानं बंड केल्यानं अख्खा देश गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर उभा राहिलाय... पुढचे 48 तास रशियासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत.. एकीकडे युक्रेनसोबत शितयुद्ध सुरु असताना दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना देशांतर्गत बंड मोडून काढण्याचं मोठं आव्हान आहे.... रशियाचं खासगी सैन्य असलेल्या वॅगनर ग्रुपनं बंड केलं... बंडानंतर राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी तातडीनं बैठक बोलवली.. त्यानंतर त्यांनी वॅगनर ग्रुपला देशद्रोही घोषित करत, प्रत्त्युतर देण्याची भाषा केली. खरंतर, युक्रेनविरोधातील युद्धात वॅगनर ग्रुपनं रशियन फौजांची मदत केली होती.. दोन्ही यंत्रणांनी एकत्रितपणे युक्रेनविरोधात युद्ध लढलं.. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून वॅगनर ग्रुप नाराज होता. त्यांची नाराजी अनेकवेळा पुढे आली होती. मात्र, रशियानं त्याकडे दुर्लक्ष केलं आणि काल त्याचा उद्रेक झाला. युक्रेन सीमेपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या रोस्तोव शहरात वॅगनर ग्रुपनं ताबा मिळवल्याचा दावा केला.. आणि पुतीन यांना राष्ट्राध्यक्षपदावरुन हटवणार अशी घोषणा करत वॅगनर ग्रुपनं मॉस्कोकडे कूच केली. आज दिवसभरात वॅगनरचे जवान वेरोनीश शहराजवळ पोहोचले. याच शहारापासून राजधानी मॉस्कोचं अंतर अवघ्या सहा तासांवर आलंय. त्यामुळे राजधानी मॉस्को सुरक्षा यंत्रणांनी हायअलर्ट जारी केलाय.. इतकंच नाही तर राष्ट्राध्य़क्ष पुतीन यांचं निवासस्थान असलेल्या क्रेमलीनची सुरक्षाही वाढवण्यात आलीय..


पुतीन बेपत्ता ?-
वॅगनर ग्रुप मॉस्कोच्या दिशेनं कूच करत असल्याची माहिती मिळतेय...प्रिगॉजीनचं सैन्य लिपेत्स्क या ठिकाणी आहेत. वॅगनरचं सैन्य सध्या मॉस्कोपासून 450 किलोमीटर दूर आहेत. यूक्रेनमधील इंग्रजी वृत्तपत्र 'द कीव इंडिपेंडेंट'नुसार रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन बेपत्ता असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पुतिन देश सोडून जाण्याच्या शक्यतेचं ट्टिवटही या वृत्तपत्रानं केलंय...दुपारी २ वाजता पुतिन यांच्या विमानानं मॉस्कोतून उड़्डाण केल्याची माहिती 'द कीव इंडिपेंडेंट'ने दिली आहे. 


प्रत्येक वाहणांची तपासणी -


रशियन मीडियानुसार, मॉस्को शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. यासेनेव्हो भागातील मॉस्को रिंग रोडच्या बाहेर पडण्यासाठी ग्रेनेड लाँचरसह एक चेकपॉईंट तयार करण्यात आलाय. प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे. वॅगनर ग्रुपकडे अजूनही वेळ असल्याचे रशियाने म्हटले आहे. त्याने आपले हात खाली ठेवून माफी मागितली पाहिजे. असेच चालू राहिले तर परिणाम वाईट होतील, स्थानिक नेत्याने म्हटलेय.