Who is Wagner: रशियामध्ये (Russia) सध्या अराजक स्थिती निर्माण झाली आहे. रशियातील खासगी सैन्य असलेल्या वॅगनर यांनी पुतीन यांनाच आव्हान दिले असून त्यांची सत्ता उलथवण्यासाठी मॉस्कोकडे (Moscow) कूच करण्यास सुरुवात केली आहे. बंडाचे निशाण फडकावल्यानंतर वॅगनर यांनी काही शहरांवर ताबा मिळवला असल्याचे दावा करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे सैन्याने बंडखोरी मोडून काढण्याची तयारी सुरू केली आहे. रस्त्यावर रणगाडे उतरवण्यात आले आहेत. 


वॅगनर गट आहे तरी काय?


रशिया-युक्रेन युद्धा दरम्यान वॅगनर गट चर्चेत आला होता. या खासगी सैन्याची स्थापनाच पुतीन (Putin) यांच्या सहमतीने करण्यात आली होती. या वॅगनर गटाचा प्रमुख येवेनगी प्रिगोझिन हा पुतीन यांचा निकटवर्तीय समजला जातो. तुरुंगातील कैदी आणि कुख्यात गुन्हेगार यांचा समावेश करून ही वॅगनर आर्मी स्थापन करण्यात आली. या खासगी सैन्यात रशियातील काही विशिष्ट रेजिमेंट आणि विशेष सशस्त्र दलाचे जवळपास 5000 जवान असल्याचा अंदाज आहे. वॅगनर हे आपल्या क्रूरतेसाठी ओळखले जातात. युक्रेन युद्धाच्या दरम्यान जानेवारीत डोनेट्स्क भागावर ताबा मिळवण्यात वॅगनर यांची मोठी भूमिका आहे. 


डिसेंबर महिन्यात, अमेरिकेच्या अंदाजानुसार, वॅगनर या खासगी सैन्यात युक्रेनमध्येच 50 हजार जवान होते. त्यात 10 हजार जवान हे कंत्राटी तत्वावर आणि 40 हजार हे रशियन तुरुंगातील कैदी होते. मात्र, रशियन सैन्याच्या कारवाईत वॅगनर गटाची कोणतीही भूमिका नसल्याचा दावा रशियाने याआधीच केला आहे. 


वॅगनरने लीबियातील गृह युद्धासह मध्य आफ्रिकन देशात आपले सैन्य, विमान धाडले असल्याचे म्हटले जाते. नागरिकांच्या हत्या करणे, संयुक्त राष्ट्राच्या शांतता सैन्यावर हल्ला करणे, अत्याचार करणे आदी आरोप लावण्यात आले होते. अमेरिकेने या वॅगनरला आंतरराष्ट्रीय पातळीवर एक गुन्हेगारी संघटना असल्याचे जाहीर केले आहे. 


येवेनगी प्रिगोझिनच्या या बंडामागे पुतीन यांना सत्तेतून खाली खेचणे हा एकमेव उद्दिष्ट्य आहे की  येवेनगीला सत्ता ताब्यात घ्यायची आहे,  यामध्ये अमेरिका इतर पाश्चिमात्य देशांची भूमिका आहे का, यासारखी अनेक प्रश्न उपस्थित झाली आहेत. 


प्रिगोझिनने धोका दिला


वॅगनर गटाने बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रपती पुतीन यांनी देशाला संबोधित केले. पुतीन यांनी म्हटले की, वॅनगर यांनी वाईट काळात रशियाला धोका दिला असून रशियन सैन्यालाही आव्हान दिले आहे. रशियन सैन्याविरोधात शस्त्र उचलणारी प्रत्येक व्यक्ती देशद्रोही असल्याचे पुतीन यांनी म्हटले. प्रिगोझिनने रशियासोबत गद्दारी केली असून पाठीत सुरा खुपसला आहे. रशिया आपल्या भविष्यासाठी लढत असून आमचे प्रत्युत्तर आणखी कठोर असल्याचे त्यांनी म्हटले. 


सैन्याविरोधात शस्त्र उचलणाऱ्यांना कठोर शिक्षा


देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पुतीन यांनी म्हटले की, देशाच्या लष्कराविरोधात शस्त्र उचलणाऱ्यांना कठोर शिक्षा देणार असल्याचे त्यांनी म्हटले. संविधान आणि लोकांच्या संरक्षणासाठी जेवढे शक्य होईल, ती पावले उचलणार असल्याचे पुतीन यांनी म्हटले. पुतीन यांनी आपल्या भाषणात पाश्चिमात्य देशांवर टीका करताना रशियाविरोधात या देशांनी कट आखला असल्याचे म्हटले.  


इतर संबंधित बातम्या: