Russia: संपूर्ण देशातील सत्तेवर एक हाती पकड ठेवणारे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Putin) यांच्याविरोधात मोठे बंड झाले आहे. पुतीन यांच्या खास निकटवर्तीयांमध्ये समावेश होत असलेले येवेनगी प्रिगोझिन (Yevgeny Prigozhin) यांनी त्यांच्याविरोधात बंड पुकारले आहे. पुतीन यांनी निवडणुकीत गैरप्रकार सत्ता काबीज केली असून त्यांना सत्तेवरून हटवण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले. देशाला आता लवकरच नवीन राष्ट्रपती मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला. तर, राष्ट्रपती पुतीन यांनी वॅगनर गटाचे (Wagner group) बंड चिरडून काढणार असल्याचे म्हटले आहे.
येवगेनी प्रिगोझिन यांच्या नेतृत्वात 'वॅगनर' सैन्याने दोन शहरांवर नियंत्रण मिळवले असल्याचा दावा केला आहे. त्याशिवाय, तीन रशियन हेलिकॉप्टर पाडले असल्याचेही त्यांनी म्हटले. वॅगनर हे प्रिगोझिन यांचे खासगी सैन्य आहे. रशियातील काही ठिकाणी येवगेनी प्रिगोझिनचे खासगी सैन्य वॅगनर आणि रशियन सैन्यात चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी भीषण युद्ध सुरू आहे. रशियन शहर रोस्तोववर ताबा मिळवला असल्याचा दावा करण्यात आला आहे. वॅनगर हे रशियातील खासगी लष्कर असून त्यांनी रशियन सैन्यासोबत युक्रेन युद्धातही सहभाग घेतला आहे.
प्रिगोझिनने धोका दिला
वॅगनर गटाने बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रपती पुतीन यांनी देशाला संबोधित केले. पुतीन यांनी म्हटले की, वॅनगर यांनी वाईट काळात रशियाला धोका दिला असून रशियन सैन्यालाही आव्हान दिले आहे. रशियन सैन्याविरोधात शस्त्र उचलणारी प्रत्येक व्यक्ती देशद्रोही असल्याचे पुतीन यांनी म्हटले. प्रिगोझिनने रशियासोबत गद्दारी केली असून पाठीत सुरा खुपसला आहे. रशिया आपल्या भविष्यासाठी लढत असून आमचे प्रत्युत्तर आणखी कठोर असल्याचे त्यांनी म्हटले.
सैन्याविरोधात शस्त्र उचलणाऱ्यांना कठोर शिक्षा
देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पुतीन यांनी म्हटले की, देशाच्या लष्कराविरोधात शस्त्र उचलणाऱ्यांना कठोर शिक्षा देणार असल्याचे त्यांनी म्हटले. संविधान आणि लोकांच्या संरक्षणासाठी जेवढे शक्य होईल, ती पावले उचलणार असल्याचे पुतीन यांनी म्हटले. पुतीन यांनी आपल्या भाषणात पाश्चिमात्य देशांवर टीका करताना रशियाविरोधात या देशांनी कट आखला असल्याचे म्हटले.
रशियात दहशतवादविरोधी कायदा लागू
RIA या वृत्तसंस्थेनुसार, वॅगनर गटाने केलेल्या बंडाविरोधात मॉस्को आणि जवळपासच्या शहरांमध्ये दहशतवाद विरोधी कायदा लागू करण्यात आला आहे. येवगेनी प्रिगोझिन यांनी वॅगनरचे सैन्य हे युक्रेनची सीमा ओलांडून रशियाच्या रोस्तोव-ऑन-डोन शहरात घुसले असून रशियन सैन्याच्या दक्षिण मुख्यालयावर नियंत्रण मिळवले असल्याचा दावा केला.