Russia  Yevgeny Prigozhin:  रशियाच्या सत्ताकारणात सर्वशक्तिमान असणारे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात बंड पुकारण्यात आले आहे. हे बंड पुतीन यांचे निकटवर्तीय येवगेनी प्रिगोझिन ( Yevgeny Prigozhin) यांनी पुकारले आहे. प्रिगोझिन यांच्या खासगी सैन्याने रशियन सैन्याविरोधात आघाडी उघडली आहे.  येवगेनी प्रिगोझिन यांच्या वॅगनर या खासगी सैन्याने (Wagner group) रशियाच्या तीन शहरांवर ताबा मिळवला असल्याचा दावा केला आहे. थेट पुतीन यांना चॅलेंज करणारे येवगेनी प्रिगोझिन आहेत तरी कोण? 


रशियातील काही ठिकाणी येवगेनी प्रिगोझिनचे खासगी सैन्य वॅगनर आणि रशियन सैन्यात चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी भीषण युद्ध सुरू आहे. रशियन शहर रोस्तोववर ताबा मिळवला असल्याचा दावा करण्यात आला आहे. वॅगनर हे रशियातील खासगी लष्कर असून त्यांनी रशियन सैन्यासोबत युक्रेन युद्धातही सहभाग घेतला आहे.      


लहान वयातच तुरुंगवास...


पुतीन यांना आव्हान देणारा येवगेनी प्रिगोझिन याचा जन्म 1961 मध्ये लेनिनग्राड येथे झाला होता. प्रिगोझिनच्या लहानपणीच त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्याची आई एका रुग्णालयात काम करत होती. शालेय जीवनात  येवगेनी प्रिगोझिनने क्रीडा अकादमीत प्रवेश घेतला होता. मात्र, मेहनत घेऊनही त्याला अॅथलेटिक्समध्ये छाप सोडता आली नाही. त्यानंतर  येवगेनी प्रिगोझिन हा गुन्हेगारीकडे वळला. गुन्हेगारी कृत्यामुळे त्याला तुरुंगात जावे लागले. सोव्हिएत महासंघाच्या विघटना दरम्यान त्याला 1990 च्या सुमारास तुरुंगातून सोडण्यात आले. 


रेस्टोरंट्समध्ये पुतीन यांच्याशी ओळख 


प्रिगोझिन तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने रेस्टॉरंट आणि वाईन शॉपही उघडले. त्या काळात उपमहापौर असलेले पुतीनही त्या रेस्टॉरंटमध्ये यायचे, असे म्हटले जाते. देशातील मोठमोठे उद्योगपती आणि नेतेही रेस्टॉरंटमध्ये येत असत. रेस्टॉरंटमध्येच पुतिन पहिल्यांदा प्रिगोझिनला भेटले होते.त्यानंतर पुतिन आणि प्रिगोझिनची मैत्री हळूहळू वाढू लागली. रशियामध्ये, अधिकृत पाहुण्यांसाठी जेवणाचे कंत्राट प्रिगोझिनला देण्यात आले.


प्रिगोझिनला याच कालावधीतील भूमिका संशयास्पद राहिल्या असल्याचे म्हटले जाते. त्याने आपल्या राजकीय भूमिका नसल्याचेही अनेक वर्ष म्हटले होते. 


खासगी लष्कराची उभारणी 


लो प्रोफाइल राहणाऱ्या प्रिगोझिनला परदेशात पुतीनचा उजवा हात म्हटले जाऊ लागले. या दरम्यान त्याने भरपूर पैसे कमावले. रशियन सैन्यासह,  येवेनगी प्रिगोझिनने खाजगी सैन्याचे नेतृत्व केले. पुतीन यांनी पडद्यामागेही याचा वापर केला असल्याचे म्हटले जाते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न असो किंवा, आफ्रिका, मध्य पूर्वेतील युद्धे लढणाऱ्या भाडोत्री सैनिकांच्या निर्दयी टोळी असोत, ही कामे  येवेनगी प्रिगोझिनच्या खासगी सैन्याने केली. प्रिगोझिन गेल्या वर्षी वॅगनरचे प्रमुख म्हणून सार्वजनिकपणे बाहेर आले. या भाडोत्री सैनिकांना पुतीन यांची शॅडो आर्मी असेही म्हणतात. 


पुतीन यांचा विश्वासू आता...


येवेनगी प्रिगोझिनच्या वॅगनर या खासगी सैन्याला यश मिळू लागल्यानंतर त्याने रशियन सैन्याविरोधात वक्तव्य करणे सुरू केले. इतकंच नव्हे तर प्रिगोझिनने एका लष्करी अधिकाऱ्याचे अपहरण करण्याचे आदेश वॅगनरला दिले होते असेही काहींचे म्हणणे आहे.


येवेनगी प्रिगोझिनच्या या बंडामागे पुतीन यांना सत्तेतून खाली खेचणे हा एकमेव उद्दिष्ट्य आहे की  येवेनगीला सत्ता ताब्यात घ्यायची आहे,  यामध्ये अमेरिका इतर पाश्चिमात्य देशांची भूमिका आहे का, यासारखी अनेक प्रश्न उपस्थित झाली आहेत.