Britain Political Crisis : ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस (Liz Truss) यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या दुसऱ्या नेत्याची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात येईल. लिझ ट्रस सध्या काळजीवाहू पंतप्रधान आहेत. लवकरच ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी निवडणूक (Britain Prime Minister Elections) होणार आहे. याचा थेट फायदा भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना झाला आहे, असं म्हणावं लागेल. कारण ऋषी सुनक पुन्हा एकदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. ऋषी सुनक यांचा पराभव करता लिझ ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधान झाल्या होत्या. ऋषी सुनक यांच्यासह पंतप्रधानपदाच्या शर्यतीत बोरिस जॉन्सन आणि कॅबिनेट सदस्य पॅनी मॉर्डौंट यांचंही नाव चर्चेत आहे.
लिझ ट्रस यांनी गुरुवारी (20 ऑक्टोबर) पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. यामुळे ब्रिटनमध्ये राजकीय भूकंप आला आहे. ब्रिटनला लवकरच नवे पंतप्रधान मिळणार आहेत. लिझ यांच्या राजीनाम्यानंतर ब्रिटनचे पुढचे पंतप्रधान कोण होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अनेक नावे आहेत. यामध्ये भारतीय वंशाचे ऋषी सुनक आणि माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचं नाव पुढे आहे.
ऋषी सुनक यांना 100 कंझर्वेटिव्ह नेत्यांचा पाठिंबा
महत्त्वाची बाब म्हणजे नामांकन प्रक्रियेची शर्यत सुनक यांनी जिंकली आहे. त्यांना उमेदवारीसाठी आवश्यक असलेल्या 100 कंझर्वेटिव्ह नेत्यांचा पाठिंबा मिळाला आहे. 24 ऑक्टोबर रोजी ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाला आठवडाभरात ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान निवड करावी लागणार आहे.
लिझ ट्रस यांचा राजीनामा
कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या लिझ ट्रस यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देत म्हटलं की, 'पक्षाने केलेला जनादेश पूर्ण करण्यात अयशस्वी ठरल्याने आपण राजीनामा देत आहे. महागाई कमी करण्यात आपण अयशस्वी ठरलो आहे.' वाढती महागाई आणि फसलेली कर रचना यामुळे लिझ ट्रस यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. लिझ ट्रस सर्वात कमी कार्यकाळ असणाऱ्या पंतप्रधान ठरल्या आहेत.
कोण आहेत ऋषी सुनक?
- ऋषी सुनक यांचे आईवडील भारतीय वंशाचे होते. पण त्यांचं कुटुंब पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये आले होते.
- सुनक यांनी ऑक्सफर्डमधील राजकारण आणि अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं.
- स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमएचं शिक्षण
- ऋषी सुनक इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षतासोबत त्यांनी लग्न केलं आहे.
- ऋषी सुनक 2015 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले.
- ऋषी सुनक यांची प्रतिमा चांगली आहे. त्यांनी कोरोनाच्या चांगलं काम केलं आहे.
- कोरोनाच्या काळात ऋषी सुनक यांनी देशाला मंदीतून यशस्वीपणे बाहेर काढलं. सुनक यांनी बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून जबाबदारी पाहिली होती.