Britain New PM : अवघ्या 45 दिवसांच्या सरकारनंतर ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस (Liz Truss) यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक (Rishi Sunak) आणि बोरिस जॉन्सन (Borris Johnson) आहेत. लिझ ट्रस सध्या काळजीवाहू पंतप्रधान असतील. लिझ ट्रस यांनी राजीनामा देत म्हटलं आहे की, पक्षाने केलेला जनादेश पूर्ण करण्यात अयशस्वी ठरल्याने आपण राजीनामा देत आहे. फसलेली कर रचना आणि वाढती महागाई यामुळे लिझ ट्रस यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. लिझ ट्रस या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या आहेत. तसेच लिझ ट्रस सर्वात कमी कार्यकाळ असणाऱ्या पंतप्रधान ठरल्या आहेत.
ऋषी सुनक आणि बोरिस जॉन्सन शर्यतीत
कंझर्व्हेटिव्ह पक्षात लिझ ट्रस यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेले ऋषी सुनक आणि माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे दोघे पुन्हा एकदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. लिझ ट्रस माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या जवळच्या मानल्या जातात. 28 ऑक्टोबरपर्यंतच्या अंतर्गत निवडणुकीच्या आधारे नवीन पंतप्रधानाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. मात्र, या काळात ब्रिटन सरकार आणि सरकारी तिजोरीवर आणखी भार वाढणार आहे. त्याआधी ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी राजीनामा दिला. शिवाय लिझ ट्रस यांनी अर्थमंत्री क्वासी क्वार्टेंग यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली होती.
'या' कारणामुळे लिझ ट्रस यांनी दिला राजीनामा
पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लिझ ट्रस यांनी मिनी बजेट सादर करत नवीन कर रचना लागू केली होती. या नवीन कर रचनेला खासदारांनी ही विरोध केला होता. ही कर रचना आणि मिनी बजेट फसलं. ब्रिटनमध्ये महागाईचं संकट आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. अशात लिझ ट्रस यांच्यावर राजीनामा देण्यासाठी त्यांच्याच पक्षाकडून दबाब होता. त्यामुळे अखेरीस त्यांनी गुरुवारी राजीनामा दिला. विशेष म्हणजे एक दिवस आधीच त्यांनी म्हटलं होतं की, 'मी हार मानणार नाही, मी राजीनामा देणार नाही.' या वक्तव्यानंतर अवघ्या 24 तासांत त्यांनी राजीनामा दिला.
नवीन पंतप्रधानाची निवड होईपर्यंत ट्रस काळजीवाहू पंतप्रधान
नवीन पंतप्रधानाची निवड होईपर्यंत ट्रस काळजीवाहू पंतप्रधान असतील. आपल्या राजीनाम्याची घोषणा करताना, लिझ ट्रस यांनी कबूल केले की, 'आपला जनादेश पूर्ण करण्यास आपण सक्षम नाही आणि म्हणूनच मी राजीनामा देत आहे.' तसेच, पुढील एका आठवड्यात कंझर्व्हेटिव्ह पक्ष नवीन पंतप्रधानाची निवड करेल, असंही त्यांनी जाहीर केलं आहे. दरम्यान या परिस्थितीवर टीका करत ही लाजिरवाणी परिस्थिती असल्याचे सांगत तात्काळ निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.