मुंबई: ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी राजीनामा दिला आहे. केवळ दीड महिन्याभराच्या कालावधीत म्हणजे 45 दिवसांत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लिझ ट्रस या ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात कमी कालावधी लाभलेल्या पंतप्रधान ठरल्या आहेत.
लिझ ट्रस सरकारने मांडलेल्या मिनी बजेटनंतर देशभरात कर रचनेवरुन गोंधळ झाला होता. या बजेटवरून ब्रिटनच्या अर्थमंत्र्यांना आणि पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या विरोधात संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्याची परिणीती आता पंतप्रधानांच्या राजीनाम्यात झाली आहे.
लिझ ट्रस सरकारने मांडलेल्या मिनी बजेटला त्यांच्या पक्षाच्या खासदारांनीही विरोध केला होता. तसेच विरोधी पक्षाच्या ऋषी सुनक यांनीही त्यांच्याविरोधात मोर्चा उघडला होता.
मला ज्या गोष्टीसाठी बहुमत मिळालं ती गोष्ट मी पूर्ण करु शकले नाही अशी प्रतिक्रिया लिझ ट्रस यांनी दिली आहे. आपला राजीनामा द्यायच्या आधी एक दिवसापूर्वी लिझ ट्रस यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यामध्ये त्या म्हणाल्या होत्या की, मी लढेन, पळ काढणारी नाही. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर राजीनामा द्यायची वेळ आली.
लिझ ट्रस यांना त्यांच्या आर्थिक धोरणांमळे राजीनामा द्यायची वेळ आल्याचं राजकीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे. गेल्या महिन्यात त्यांनी जी काही आर्थिक धोरणं राबवली त्यामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाला. ब्रिटनचे चलन पाऊंडच्या किंमतीमध्येही घसरण झाली.
ब्रिटनमध्ये वाढता टॅक्स आणि महागाई याच्याविरोधात आवाज उठवून त्या निवडून आल्या होत्या. महागाईने खंगलेल्या नागरिकांना त्यांच्यापासून मोठ्या अपेक्षा होत्या. पण लिझ ट्रस यांना केवळ 45 दिवसात राजीनामा द्यावा लागला आहे. गेल्या आठवड्यात त्यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले होते.
लिझ ट्रस या पहिल्यांदा 2010 सालच्या निवडणुकीत दक्षिण-पश्चिम नॉरफोकमधून निवडल्या गेल्या. खासदार झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांनी 2012 मध्ये त्यांना ब्रिटनचे शिक्षणमंत्री बनवण्यात आले आणि 2014 मध्ये त्यांना पर्यावरण सचिव म्हणून बढती देण्यात आली. गेल्या वर्षी त्यांच्यावर मोठी जबाबदारी देत त्यांना परराष्ट्र मंत्री करण्यात आलं. 6 सप्टेंबर 2022 रोजी त्यांनी ऋषी सुनक यांचा पराभव केला आणि त्या ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या.