Nepal New PM Pushpa Kamal Dahal Prachanda : पुष्प कमल दहल प्रचंड (Pushpa Kamal Dahal Prachanda) पुन्हा एकदा नेपाळच्या (Nepal) पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत.  नेपाळचे नवे पंतप्रधान (Nepal New PM) म्हणून प्रचंड आज सोमवारी (26 डिसेंबर) स्थानिक वेळेनुसार, दुपारी 4 वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेतील. पुष्प कमल दहल प्रचंड आज तिसऱ्यांदा नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. नेपाळच्या राष्ट्रपती कार्यालयाने ट्विट करून ही माहिती दिली. माओवादी नेते पुष्प कमल दहल प्रचंड हे नेपाळचे पुढील पंतप्रधान असतील. राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी देशाचे नवे पंतप्रधान म्हणून प्रचंड यांची नियुक्ती केली आहे.


नेपाळच्या पंतप्रधानपदी पुष्प कमल दहल प्रचंड


नेपाळमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्यानंतर नाट्यमय घडामोडी झाल्या. विरोधी सीपीएन-यूएमएल पक्ष (CPN-UML) आणि इतर लहान पक्षांनी प्रचंड यांना पाठिंबा देण्याचे मान्य केले. यामुळे प्रचंड यांच्या नावावर पंतप्रधान पदासाठी रविवारी शिक्कामोर्तब झाला. त्यानंतर आज त्यांचा शपथविधी पार पडणार आहे.






नेपाळमधील नाट्यमय घडामोडी


सीपीएन-माओवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या पक्षाला 89 जागांवर विजय मिळाला. काँग्रेस-माओवादी आघाडीला जनतेने बहुमत (121) दिले. कोणताही पक्ष नेपाळमध्ये सरकार स्थापनेसाठी त्यांना 275 जागांवरील 132 जागांचा आकडा पार करू शकले नाहीत. या परिस्थितीत प्रचंड हे पंतप्रधान होण्यावर ठाम होते. प्रचंड यांनी नेपाळी काँग्रेस नेते देउबा यांच्यासोबतची युती तोडली. त्यांनी जुने मित्र केपी शर्मा ओली यांच्यासोबत हातमिळवणी केली आणि सरकार स्थापनेचा दावा केला.


भारताचे मित्र देउबा विरोधी पक्षाच्या भूमिकेत


नेपाळी काँग्रेस नेते शेर बहादुर देउबा यांना भारताचा मित्र मानले जाते. तज्ज्ञांचे मते, नेपाळमध्ये शेर बहादूर देउबा यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले असते किंवा प्रचंड यांची त्यांच्याशी असलेली युती कायम राहिली असती तर भारतासाठी चांगली परिस्थिती निर्माण झाली असती.


प्रचंड यांनी विरोधी पक्षांकडून पाठिंबा


निवडणुकांत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. यानंतर माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखाली सीपीएन-यूएमएल पक्ष (CPN-UML) , सीपीएन-एमसी (CPN-MC), राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष (RSP) आणि इतर लहान पक्षांची बैठक झाली. बैठकीत 'प्रचंड' यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यावर सर्व पक्षांचे एकमत झाले. त्यामुळे प्रचंड यांचा सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, केपी शर्मा ओली हे चीन समर्थक आहेत.


नेपाळच्या नव्या सरकारचं चीनकडे झुकते माप


पुष्प कमल दहल हे उग्र माओवादी चळवळीतून पुढे आलेले नेते आहेत. चीनचे नेते माओ त्से तुंग यांचा सुरुवातीपासूनच त्यांच्यावर खोलवर प्रभाव होता. नेपाळमध्ये लोकशाही आल्यावर प्रचंड यांची चीन सरकारशी जवळीक निर्माण झाली. मात्र, चीनशी जवळीक साधूनही त्यांना नेपाळमध्ये फार काळ सत्ता मिळवता आली नाही. 2015 मध्ये संविधान लागू झाल्यापासून आतापर्यंत नेपाळमध्ये 5 वेळा पंतप्रधान बदलण्यात आले आहेत.


नवे पंतप्रधान प्रचंड यांनी समर्थन देणारे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली हे चीन समर्थक आहे. चीनसंदर्भात केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे ते बराच काळ चर्चेत होते. प्रचंड यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणार सरकार माओवाद्यांच्या पाठिंब्यावर तसेच नॅशनल डेमोक्रॅटिक पार्टीसारख्या राजेशाहीला पाठिंबा देणाऱ्या पक्षावर आधारित आहे. अशा परिस्थितीत प्रचंड आणि ओली यांना पूर्णपणे चीनच्या बाजूला झुकणं शक्य होणार नाही. पण याबाबत येत्या काळातच चित्र अधिक स्पष्ट होईल.