Imran Khan : पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान आज (बुधवारी) पेशावरमध्ये रॅली घेणार आहेत. पाकिस्तानातील सत्ता परिवर्तनानंतर इम्रान खान यांची ही पहिलीच सभा असेल. इम्रान खान यांनी ट्विट केले की, बुधवारी (१३ एप्रिल) मी पेशावरमध्ये जलसा (Rally) आयोजित करणार आहे, 


पाकिस्तानची निर्मिती ही परकीय शक्तींची कठपुतली म्हणून नव्हे, तर..


त्यांनी पुढे लिहिले की, या रॅलीला पार्टीतील सर्व लोकांनी यावे अशी माझी इच्छा आहे, कारण पाकिस्तानची निर्मिती परकीय शक्तींची कठपुतली म्हणून नव्हे तर एक स्वतंत्र, सार्वभौम राज्य म्हणून झाली आहे. इम्रान खान यांनी आपल्या ट्विटमध्ये असेही म्हटले आहे की, आम्ही तात्काळ निवडणुकांची मागणी करत आहोत कारण हा एकच मार्ग आहे - निष्पक्ष आणि मुक्त निवडणुकांद्वारे, लोकांना त्यांचा पंतप्रधान कोण हवा आहे हे ठरवू द्या.


 




पेशावरच्या रॅलीपूर्वी माजी पंतप्रधानांचा एक व्हिडिओ शेअर


इम्रान खान यांनी मंगळवारी देशातील नागरिकांना सार्वत्रिक निवडणुकांची मागणी करण्याचे आवाहन केले. पीटीआय नेत्याने असेही म्हटले की, कोणतेही सैन्य किंवा परदेशी संस्था आपल्या देशाचे रक्षण करू शकत नाही, केवळ पाकिस्तानच स्वतःचे रक्षण करू शकते यावर जोर दिला. इम्रान खान यांचा राजकीय पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ने पेशावरच्या रॅलीपूर्वी माजी पंतप्रधानांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ते म्हणाले की ते रॅलीत लोकांना संबोधित करतील आणि त्यांना सत्तेपासून दूर करणाऱ्या मोठ्या षड्यंत्राबद्दल बोलतील. इम्रान खान यांनी संयुक्त विरोधी पक्षाच्या अविश्वास प्रस्तावाचा हवाला देत म्हटले की, पाकिस्तानमध्ये "मोठे षडयंत्र" रचले गेले, ज्यामुळे त्यांना पदावरून हटवण्यात आले.


शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली


8 मार्च रोजी इम्रान खान यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर शाहबाज शरीफ यांनी सोमवारी पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी यांच्या अनुपस्थितीत सिनेटचे अध्यक्ष सादिक संजरानी यांनी 70 वर्षीय शाहबाज यांना मंत्रिपदाची शपथ दिली.