यांगून :  भारताचा शेजारी देश म्यानमारमध्ये लोकशाही सरकार उलथवून लष्कराने पुन्हा एकदा सत्ता हाती घेतली आहे. या विरुद्ध शांततेत निदर्शने करणाऱ्यांवर लष्कराने आणि पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत शंभरहून अधिक जणांना मारण्यात आले आहे.  त्यामुळे शनिवार हा सर्वात रक्तरंजित दिवस ठरला.


ऑनलाईन समाचार वेबसाईट 'म्यांमा नाऊ'ने दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या या कारवाईत 114 हून अधिक जणांना मारण्यात आले आहे. या पूर्वी म्यानमारमध्ये 14 मार्चला आंदोलन करणाऱ्यांना ठार मारण्यात आले होते. त्या कारवाईत 74-90 जणांना मारण्यात आले होते. आतापर्यंत 420 हून अधिक लोकांना मारण्यात आले आहे.


म्यानमारमध्ये लोकशाही सरकार उलथवून लष्कराने सत्ता हातात घेतल्याने संयुक्त राष्ट्र संघटनेने त्या देशावर आता आर्थिक निर्बंध घालण्याची तयारी सुरु केली आहे. म्यानमारच्या प्रश्नावर रशियाने वेगळी भूमिका घेतली आहे. म्यानमारशी रशिया आपले लष्करी संबंध अधिक बळकट करण्यावर भर देणार असल्याचं सांगत म्यानमार हा रशियाचा विश्वासू सहकारी देश असल्याचं रशियाच्या उप-सरंक्षण मंत्र्यांनी या आधीच स्पष्ट केलंय. तसेच म्यानमारच्या लष्कर प्रमुखांनी आपण एकटे नसून जगातले काही देश आपल्यासोबत असल्याचं सांगितलं असून संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिंक निर्बंधाच्या धमक्याचा काही परिणाम होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. म्यानमार प्रश्नावरून रशियासोबत चीनचीही भूमिका संशयास्पद आहे.


या सर्व घडामोडीवर भारताची बारीक नजर असल्याचं दिल्लीतील सूत्रांनी सांगितलंय. म्यानमारमध्ये लोकशाही नसणं हे भारतासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. तसेच त्या देशावर चीनचे वर्चस्व वाढण्याचीही शक्यता आहे.