Pripyat Population : आपण सर्वांनी पाहिलेल्या बी आर चोप्रांच्या महाभारतात शेवटच्या एपिसोडमध्ये एक सीन आहे, अश्वत्थामा पांडवांवर ब्रह्मास्त्र सोडतो त्याला प्रत्युत्तर म्हणून अर्जुनाकडूनही कृष्णाच्या सांगण्यावरुन ब्रह्मास्त्र सोडले जाते. यानंतर महर्षी व्यास 'मध्ये' येतात आणि दोन्ही अस्त्र आपल्या दोन्ही हातांवर झेलत 'ती' रोखतात. 


त्यानंतर "हे ब्रह्मास्त्र आहे हे सर्व भूमंडलाचा विनाश करेल असं सांगताना अशा पद्धतीची अस्त्र युद्धासाठी वापरायची नसतात," असं म्हणत दोघांनाही ते अस्त्र परत घेण्याची आज्ञा करतात आणि कृष्णालाही जाब विचारतात. यानंतर पुढचा संवाद आणि मग अश्वत्थामा शाप प्रसंग दाखवलेला आहे. 


ही गोष्ट इथे सांगण्याचं कारण असं की ज्यावेळी मानवाकडून या अतिसंहारक अशा शक्तींचा दुरुपयोग होतो किंवा निष्काळजीपणा केला जाते तेव्हा तेव्हा  निसर्ग, नियती किंवा तीच संहारक शक्ती अश्वत्थामाचा शाप बनून मानवावर उलटते. त्यामुळे या संहारक शक्तींचा वापर करताना गलथानपणाला वाव असत नाही याचा दाखला देणारी ही गोष्ट आहे. 


अणुशक्तीचा शोध लागल्यानंतर त्याचा वापर जसा युद्धात केला गेल्यानंतर त्याचे कसे भयंकर परिणाम होतात हे आपण जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी शहराच्या विद्ध्वंसामध्ये पाहिलं. तसेच याच अणू शक्तीचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करताना झालेल्या गाफिलपणाचा फटका काही युरोपमधल्या देशांना तर बसलाच पण त्याचबोरबर एक प्रीप्यत नावाचं अख्खं शहर आज निर्मनुष्य अवस्थेत सोडावं लागलं आणि पुढच्या तब्बल 20 हजार वर्षांसाठी, तब्बल २० हजार वर्षांसाठी....!!


सध्या धुमसत असलेल्या युक्रेनमध्ये 1970 सालच्या तेव्हाच्या रशियात प्रीप्यत नावाचं शहर वसवलं गेलं ते शेजारीच असलेल्या चर्नोबिल या अणुऊर्जा पॉवर प्लान्टसाठी. जगामध्ये अनेक देश अणूऊर्जेच्या माध्यमातून वीजनिर्मितीकडे त्या वेळेला वळू लागले होते. स्पर्धा, वीजेची वाढती मागणी यामुळे अणुशक्तीच्या आधारे टर्बाईन फिरवून त्यातून वीजनिर्मितीचे प्लान्ट आकाराला येऊ लागले.


त्यावेळी रशियावर राज्य करणाऱ्या 'सार; घराण्यानेही अमेरिकेच्या वाढत्या वर्चस्वाला टक्कर देण्यासाठी वीजेची असलेली महत्त्वात्वाची मागणी पूर्ण करण्यासाठी कीव शहरापासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या चर्नोबिल या ठिकाणी 1970 साली अणूऊर्जा वीज प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला.


चार न्यूक्लिअर रिअॅक्टर्स उभे केले गेले, मग त्याशेजारीच या अणूऊर्जा प्रकल्पात काम कर करणाऱ्यांसाठी एक शहर वसवण्याचं ठरवलं गेलं. शेजारी वाहत असलेल्या प्रीप्यत नदीवरुन त्याला नाव देण्यात आलं प्रीप्यत. 1979 मध्ये या प्रीप्यतला शहराचा दर्जा प्राप्त झाला, इकडे चर्नोबिल अणुऊर्जा वीज प्रकल्पाचे चारही रिअॅक्टर्स 1983 पर्यंत सुरु झालेले होते. 


अणुऊर्जेच्या साहाय्याने मोठे मोठे टर्बाईन फिरत होते. वीज तयार करत होते, पण 26 एप्रिल 1986 च्या दिवशी सगळंच बदललं. त्या रात्री प्लान्टमध्ये एक सेफ्टी टेस्टिंग करण्याचा निर्णय केला गेला, परंतु एका अणूऊर्जा प्रकल्पामध्ये पाळावयाचे सेफ्टी फीचर्स पाळले गेले नाहीत. 


एका टेक्निकल बाबीमध्ये त्याचा परिणाम असा झाला की, "न्यूक्लिअर रिअॅक्टरच्या प्रक्रियेदरम्यान कंन्ट्रोल केले जाणारे न्यूट्रॉन कंन्ट्रोल न झाल्यामुळे रिअॅक्टरमधला न्यूट्रॉन कंन्ट्रोल करणारा रॉड प्रचंड प्रमाणात गरम होऊ लागला, हे लक्षात आल्यानंतर तो रॉड काढून पाण्याच्या टाकीत टाकण्यात आला, परंतु तो इतका गरम झाला होता की त्या पाण्याची काही क्षणांत वाफ झाली. 


परिणाम असा झाला की काही वेळातच चौथ्या न्यूक्लिअर रिअॅक्टरमध्ये भयंकर स्फोट झाला. आगडोंब उसळल्याने रिअॅक्टरवर असलेलं छत आकाशात कुठल्या कुठे फेकलं गेलं, आसपास उभे असलेले कर्मचारी जळून खाक झाले, ही घटना मध्यरात्रीच्या वेळेस घडली. आवाज आणि उसळलेला आगडोंब यामुळे प्रीप्यत शहरातले लोक जागे झाले, जो तो आपल्या घरातून बाहेर पडला आणि एका पुलावर येऊन जिथून हा नजारा दिसत होता तिथे येऊन उभा राहिला.


पण कोणालाही ही कल्पना नव्हती की या स्फोटानंतर या प्लान्टमधून भयंकर रेडिओ अॅक्टिव्ह कण बाहेर पडत होते आणि वातावरणात पसरले जात होते, ज्याचा भयंकर परिणाम दिसणार होता. शासनाकडून लगेचच उपाययोजना सुरु झाल्या. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी धावत होत्या, आग विझवण्यासाठी. 


परंतु ही नुसती आग असती तर ठीक होतं पण ही नुसती आग नव्हती, तो जीवनची राख करणाऱ्या भयंकर रेडिओ अॅक्टिव्ह कणांचा स्त्रोत होता. रिअॅक्टरमधून बाहेर पडणारे ही रेडिओ अॅक्टिव्ह कण वेगाने अवकाशात पसरत होते, हवेबरोबर मग नुसत्या रशियाच्या भागातच नाही तर युरोपीय देशांवरही ही लहर जाऊ लागली. 50 हजार लोकसंख्या असलेलं प्रीप्यत शहर तर लगेचच रिकामं करण्याचे आदेश दिले गेले. लोकांनी घरं-दारं आहे तशी सोडली आणि प्रीप्यतला राम-राम केला.


त्यानंतर प्रीप्यत आणि आसपासच्या कित्येक किलोमीटर अंतरावर राहात असलेल्या लोकांना भयंकर व्याधींनी, कॅन्सरसारख्या रोगांनी घेरलं या रेडिओ अॅक्टिव्ह किरणांच्या प्रार्दुभावामुळे. प्रीप्यत शहर तर पूर्णपणे निर्मनुष्य झालं होतं. मोठ्या मोठ्या इमारती, घरं, ऑफिसेस, खेळाची मैदानं, रस्ते ओस पडले. 


मानवाच्या महत्त्वांकांक्षेची फळं मग जनावरांनाही भोगावी लागली, त्यांच्यावरही या किरणोत्साराचा महाभयंकर परिणाम झाला, असाध्य रोगांनी त्यांनाही ग्रासलं.


आजही प्रीप्यत शहरामध्ये या किरणोत्साराचा प्रभाव आहे, एकेकाळची नटलेली-सजलेली प्रीप्यत शहराची सूरत आज बदसूरत झाली आहे. नटलेला प्रीप्यत शहराचा सुंदर चेहरा आज भेसूर दिसत आहे. जिथे हा स्फोट झाला त्या जागेवर बाहेर पडणारा किरणोत्सार रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या गेल्या, जिथे रिअॅक्टर्स होते त्याजागी मोठ्या प्रमाणात माती टाकण्यात आली, काँक्रिटचं मोठं आवरण तयार केलं गेलं रेडिएशन बाहेर पडू नये यासाठी. त्यावर शेडचीही आणखी आवरणं घालण्यात आली.


परंतु आजही प्रीप्यत शहरातच्या ठिकाणी असलेलं रेडिएशनचं प्रमाण प्रचंड आहे. ज्यावेळी हा स्फोट झाला त्यावेळी बाहेर पडत असलेलं रेडिएशन हिरोशिमा – नागासाकीवर टाकून निर्माण झालेल्या रेडिएशनपेक्षा 400 पट जास्त होतं. जिथे चौथा रिअॅक्टर होता त्याठिकाणची तर स्थिती अशी आहे की त्या जागेवर जर कोणीही व्यक्ती एक तासासाठी उभी राहिली तरी त्या व्यक्तीचा मृत्यू होईल. 


या घटनेला आज 36 वर्षे झाली आहेत, या काळात ज्या-ज्या वेळी, अनेकदा रेडिएशन तपासलं गेलं त्यात्या वेळी रेडिएशनची लेव्हल हायच होती. आपल्याला खरं वाटणार नाही पण पुढची 20 हजार वर्षे, प्रीप्यतमध्ये कोणालाही राहता येणार नाहीए रेडिएशनमुळे अशी स्थिती आहे.


दर 100 वर्षांनी रिअॅक्टर्स जिथे होते त्या ठिकाणी आवरण निर्माण करण्याची जबाबदारी आता मानवावर येऊन पडलेली आहे. या घटनेत निसर्गाचं जे अमाप नुकसान झालं त्याचा हिशेबच न लावलेला बरा. जीवितहानी ही फक्त मानवाचीच मोजून कसं चालेल, झाडं, पाळीव प्राणी, वन्यप्राणी, कीटक त्याचबरोबर जलस्त्रोतांचं अतोनात नुकसान झालं. 


विज्ञानाचा वापर चुकीच्या पद्धतीने झाला किंवा वापर करताना गलथानपणा झाला तर विज्ञान तुम्हाला पुन्हा शून्यातच नेऊन ठेवतं याचं उत्तम प्रीप्येत आहे. गुगलवर प्रीप्यतची लोकसंख्या दाखवत असलेलं ते 0 खरंतर विज्ञानानं आपल्याला पुन्हा कसं शून्यात नेऊन ठेवलंय याचं ते द्योतक आहे. मानवाने बोध घ्यावा इतकंच...!!


प्रशांत कुबेर यांच्या आधीचे लेख