India Maharashtra Village 10 unique villages : आपल्या देशाच्या राष्ट्रीय प्रतिज्ञेमध्ये 'माझ्या देशातल्या समृध्द आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे' असं वाक्य आहे. या देशाच्या विविध कोपऱ्यात फिरताना आपल्याला अनेकदा असे अनुभव येतात की हा देश खरोखरच किती विविधतेनं नटलेला आहे. प्रत्येक गावाची देशाच्या, राज्याच्या परंपरेबरोबर प्रत्येक वेगळी एक परंपरा असते. याचा प्रत्यय आपल्याला या विविध गावांमध्ये भेट दिल्यानंतर येतो. अशीच काही अनोखी गावं आणि त्यांच्या प्रथा पंरपरेची मजेशीर माहिती आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय.


पहिली काही गावं पाहूया महाराष्ट्रातली…


1. बोला…कोण माय का लाल “या गावात” जावून वाचेल हनुमान चालिसा…? 


सध्या हनुमान चालिसावरुन अवघ्या देशात वातावरण तापलंय, पण देशात एक गाव असं आहे की तिथं तुम्ही मारुतीच्या संदर्भातलं कुठलंही स्त्रोत्र, आरती, भजन इथं म्हणू शकत नाही. हा निय़म गेली हजारो वर्षांपासून सुरु आहे. या गावात मारुतीचं मंदिर नाही, मारुती नावाचा माणूस नाही, मारुती नावाच्या मुलाला इथली मुलगी दिली जात नाही, मारुती नावाचं कोणी गावात आलं  तर त्या नावानं हाक मारलीही जात नाही….अहो, इतकंच काय तर मारुती गाडीही इथे कुणी विकतही घेत नाही. जिल्हा अहमदनगर आणि गावाचं नाव आहे दैत्यनांदूर…! त्याचं झालं असं बिभीषणाबरोबर आलेल्या निंबा नावाच्या दैत्याला हनुमंत म्हणजे मारुतीराव ओळखत नव्हते, दोघांचं काही कारणास्तव भांडण झालं दोघांची झुंज सुरु झाली. बिभिषणाबरोबर आलेला निंबा-दैत्य हाही श्रीराम भक्त आणि मारुतीही. 


दोघांचं घनघोर युध्द सुरु झालं. काही वेळानं मारुतीवर निंबा-दैत्य हावी होऊ लागला त्यानंतर मारुतीनं श्री रामाचा जप सुरु केला, हे बघून निंबा-दैत्य बुचकळ्यात पडला. आपल्या श्रध्दास्थानाचं नाव हाही घेतो आहे याचं त्याला आश्चर्य वाटलं. दोघंही थांबले, एवढ्यात श्री राम त्या ठिकाणी आले, त्या दोघांनीही श्री रामाला नमस्कार केला. श्री रामानं दोघांनाही समजावलं, बरं दोघंही निस्सीम भक्त. दोघांची बाजू ऐकून घेतल्यावर श्री रामानं निंबा-दैत्याला नांदूर हे गाव देऊन टाकलं. पण निंबा-दैत्यानं श्री रामाला एक विनंती केली की माझ्या गावातून या मारुतीला बाहेर जायला सांगा, कायमचं. श्री रामानं मारुतीला आदेश दिला की तू यापुढे या गावात यायचं नाहीस. श्री रामानं दिलेला आदेश मारुती मानणार नाही हे शक्यच नव्हतं, नमस्कार करुन मारुतीनं त्या गावचा निरोप घेतला तो कायमचाच. आता त्या गावात मारुतीचं मंदिर नाही, नावाचा माणूस नाही, मारुती नावाच्या माणसाला इथली मुलगी दिली जात नाही, मारुती नावाचं कोणी गावात आलं  तर त्या नावानं हाक मारलीही जात नाही आणि विशेष म्हणजे मारुती गाडीही इथे कुणी विकतही घेत नाही. 


मारुती गाडी विकत घेतलेल्यांना विचित्र अनुभव आल्याचे गावतले लोक सांगतात. आता बोला…!! कोण म्हणेल इथं जावून हनुमान चालीसा…!!


2. अख्खं गाव…पाकिटमार…!!
असंच एक गाव आपल्या महाराष्ट्रात आहे की ज्यांचा पूर्वीचा घरटी आणि पीढीजात व्यवसाय ऐकून तुम्ही चाट पडाल. गावाचं नाव इथं सांगता येत नाही पण व्यवसाय ऐका. व्यवसाय नव्हे…उद्योग…उद्योग नव्हे…महाउद्योग…महाउद्योग नव्हे हो…उद्योगी…उद्योगी…!! इथला घरटी एक माणूस पूर्वी पाकिटमार होता. अगदी इथला सरपंच-उप सरपंचदेखील. मुंबईत-नवी मुंबईत, पुण्यासारख्या मोठ्या शहरांत जाऊन लोकांचे खिसे हलके करणं, प्रवाशांचं वजन कमी करण्याच्या या “उद्योगात” अख्खं गाव गुंतलेलं, दिवस-रात्र.  मुंबईत असताना तुमचं पाकिट मारलं गेलं आणि तुमची या गावात ओळख असेल तर तुम्हाला तुमचं पाकिट परत मिळतं, पैशाबरोबर माफीसहीत.  मी राहिलोय या गावात, माझ्या कामासाठी. बरोबरच्या व्यक्तीला मी म्हणालो अहो, आमचे कॅमेरे 10-10 लाखांचे आहेत, इथं कसं काय राहायचं…?? ते म्हणाले, नाही नाही काळजी करु नका “पाहुण्याला काही धोका नाही…!!”. आणि खरोखरच सरपंचाच्या आईनं मुलांना वाढावं तसं वाढलं आम्हाला, त्याच्यात घरात झोपलो शांत. आहे की नाही गंमत…??


3. इथे दूधापासून लोण्यापर्यंत काही विकत नाही फक्त पिकतं…!!


असंच एक गाव आहे अहमदनगरमध्ये गावाचं नाव एकनाथवाडी…!! इथे दूध-तूप, दही-लोणी, ताक म्हणजे असे कुठलेही पांढरे पदार्थ विकले जात नाहीत. तिथे तुम्ही गेलात तर तुम्हाला हे पदार्थ विनामूल्य मिळून जातात. अशी सगळी गंमत आहे. 
 
4. अरे बापरे…!! जिकडे-तिकडे नागोबा…!!


महाराष्ट्रातल्याच सोलापूर जिल्ह्यात शेटफळ नावाचं एक गाव आहे, इथे तुम्ही गेलात तर अंगावर काटा उभा राहिल. लहान-लहान मुलं कशाशी खेळतायत हे पाहून हादरुन जाल. इथे घरो-घरी नागराज वास करतात. घरात चक्क कोब्रा जातीच्या नागांसाठी वेगळी जागा केलेली असते. चिमण्य़ा फिराव्यात तसे इथे नाग फिरतात गावाच्या रस्त्यावरुन, पण कोणी घाबरेल तर शप्पथ. छोटी छोटी पोरं नागोबाला कुरवाळत बसलेली असतात. एकेका घरात ढिगानं काय असतात तर नागोबा. पण आजपर्यंत इथे नागराजांचा दंश झाल्याची घटना नाही असं सांगितलं जातं. 
 
5. जिथे एकाही घराला दार नाही…!! 


शनी शिंगणापूर…हे गाव राज्यात काय देशात कुणाला माहित नसेल असं नाही. माणसाला वाटलं की आपल्याला साडेसातीचा त्रास होतोय, की माणूसाची पावलं या गावाकडे वळतात. पण इथे शनी देवाच्या मूर्तीबरोबरच आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इथे घरांना नसलेली दारं. एकाही घराला इथे दार आढळत नाही. कारण असं म्हणतात की इथे चोरी होत नाही आणि झाली तर चोरी करणाऱ्याला शनी देवतेकडून शिक्षा दिली जाते. त्यामुळे इथे घरांच्या दारांसाठी दारं बंद आहेत.
 
आता महाराष्ट्राच्या बाहेरचं पाहूया…
 
6. मार त्याच्या नावची शिट्टी बोलंव त्याला इकडे…!!


मेघालयात एक असं गाव आहे कोंगथोंग…या गावात आपण जसे एकमेकाला नावाने हाक मारतो तसं इथं एकमेकाला हाक मारताना विशिष्ट ट्यून वा शिट्टी वाजवून बोलवलं जातं. विशेष म्हणजे एक ट्यून वा शिट्टी एकासाठीच वाजविली जाते. प्रत्येक व्यक्तीसाठी वेग वेगळी ट्यून वा शिट्टी आहे, काँपीराईटची गुंजायीशच नाही.  गावातल्या अबाल-वृध्दांसाठी सर्वांसाठीच हा कार्यक्रम आहे. गावात गल्ली-बोळातून चालताना आपल्याला हा अनुभव येतो. नवीन जन्मलेल्या अर्भकासाठी  गावातले लोक त्याचे आई-वडील शिट्टी वा ट्यून ठरवितात जी इतरांच्या कुठल्याही ट्यूनला मँच होत नाही. मग काय गावात एक वेगळी ट्यून आणि शिट्टी जन्माला येते त्या अर्भकाबरोबर. आहे की नाही विविधतेने नटलेला आपला देश…!!


 7. गावात जवळ-जवळ घरटी एक सीता और गीता वा राम और श्याम…!!


केरळमध्ये मलप्पूरम जिल्ह्यातल्या कोडिन्ही गावात जर तुम्ही गेला तर सीता और गीता, राम और श्यामच्या अनेक जोड्या दिसतील.  इथे जवळ-जवळ घरटी एक जुळं जन्माला येतं असं म्हणलं तरी हरकत नाही. कस काय काय माहिती राव…?? शास्त्रज्ञांच्या पण मेंदूला अटॅक आला, काय गोंधळ आहे कळेना, आयला. एकाची एक झेरॉक्स निघतीच घरटी एक जवळ-जवळ. 2016 साली शास्त्रज्ञांची एक टीम भेट द्यायला, मेंदू भाजून निघाला अन् गेली मग आपल्या गावाकडे परत. काही कळेना काय कारण आहे.  काय वातावरण पोषक आहे…?? का पाणी पोषक आहे…??  की मातीच तशी आहे…?? की लोकंच दांडगी आहेत, कोण जाणे…?? पण शास्त्रज्ञांनी परिक्षा नळ्यांमध्ये आणि सूक्ष्म दर्शकांत जे डोकं घातलंय ते बाहेर काढेनात या गावातून गेल्यापासून, शोधच लागेना राव…!!
 
8. गावात राव सगळेच 'सडा फटींग', गेल्या 50 वर्षांत एकही लग्न नाही लागलं गावात. अरे देवा…!!


बिहारमधलं बरवा काला गावावर एक कलंक आहे, गावात सोयी - सुविधा नसल्यानं गावातली पोरं ही अशी बिना “कामा”ची गावात फिरतायत, पोरगीच कोण देईना राव. गेल्या पन्नास वर्षांत इथे एकही लग्न झालेलं नाही म्हणतात. एकमेकांची तोंड पाहात, गावतल्या आवडलेल्या पोरी हळद लावून दुसऱ्याच्या झाल्या, गावातून निघून गेल्या आणि आम्ही बसलोय चकाट्या पिटत….!! काय करणार काय…? दोन वर्षांपूर्वी गावातली 121 तरणीबांड पोरं होती बिना लग्नाची. गावातल्या पोरी सुध्दा हाताला लागत नाहीत गावत सोयी सुविधा नसल्यानं अशी अवस्था. कदाचित आता काय फरक पडला असेल कोण जाणे…?  पण केवळ गावात पाण्य़ाची सुविधा नाही, पाणी डोक्यावर वाहून आणावं लागतंय, शिक्षण, रस्ते, लाईटची सुविधा नाही, आरोग्य व्यवस्थेची बोंब, वाहतूकीची ओरड अशी सगळीच वानवा असल्यानं तरणी-ताठी पोरं एकमेकाचं तोंड बघत गल्लो-गल्ली दिसत होती. काय बोलायचं. परंपरेच्य़ा विविधतेत व्यवस्थेचा बळी ठरलेल्या अशा गावची कहाणीही आम्हाला लिहावी लागली. 
 


9. अरे…आपण भारतात आहोत की वेस्ट इंडिजमध्ये…??


तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि तुम्हाला या गावात सोडलं तर तुम्हाला वाटेल की वेस्ट इंडिज किंवा अफ्रिकेत आलो की काय़…?? गुजरातमधल्या जुनागढ या जिल्ह्यात जंबूर नावाचं एक गाव आहे. तिथे गावात सगळे निग्रोच राहतात, पण बोलतात मात्र गुजराथी. केम छो..?? त्याचं झालं असं सुमारे 200 वर्षापूर्वी अरबस्थानातून आलेल्या राजानं या लोकांना कामासाठी इथे आणलं. ते आले ते इथलेच झाले. छोट्या वस्तीची मोठी वस्ती झाली आणि नंतर गावानं वस्तीचा आकार घेतला. आता हे लोक भारतीयच नाही तर गुज्जू झालेत. अस्खलीत गुजराथी बोलतात…केम छो..?? मजा मछ छो…!! आज हे ठिकाण पर्य़ंटकांसाठी एक महत्वाचं स्थान बनून राहिलं आहे. पर्यटक इथे येतात या लोकांबरोबर फोटो काढतात, चित्र काढतात. 
 


10.  संस्कृत जिथे जिवंत आहे…!!


कर्नाटक, मत्तूर. या गावात जाल तर तुम्हाला महाभारताच्या काळात आलो की काय असं वाटेल. कारण इथे राहणारे सर्वच लोक एकमेकाशी संस्कृत भाषेत बोलतात. रोजचे दैनंदिन व्यवहार संस्कृत भाषेतच केले जातात. लहान मुलांपासून वृध्दांपर्यंत इथे संस्कृतमध्ये बोललं जातं. सुमारे 600 वर्षांपूर्वी केरळमधून आलेल्या ब्राम्हण समाजातल्या लोकांची या गावात वस्ती असल्याने पूजा-पाठ वगैरे करणारे हे लोक संस्कृतमध्येच बोलतात. त्याचबरोबर संकेती नावाची एक दुर्लभ भाषाही हे लोक बोलताना पाहायला मिळतात.