टोकियो : आधी वादळ आलं आणि मग भूकंप झाला... आता सुनामीचा धोका... गेल्या तीन दिवसांपासून जपान नैसर्गिक आपत्तीचं तिहेरी संकट भोगत आहे. 12 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं, पण तरीही यात 11 जणांचा मृत्यू झाला.

मंगळवारी जपानमध्ये आलेल्या जेबी या तुफानी वादळाने जपानची दुर्दशा केली. समुद्रातल्या बोटी चक्क शहरात घुसल्या, गाड्या चक्क हवेत उडून एकमेकांवर चढून बसल्या. 170 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहिले. घरांचेच नाही, तर मोठमोठ्या इमारतींच्या ठिकऱ्या उडाल्या, बंदरातल्या महाकाय क्रेन पत्त्यासारख्या कोसळल्या, जपानचं अख्खं विमानतळ पाण्यात बुडालं.

जपानमध्ये आज (गुरुवारी) सकाळी पहाटे 3 वाजता 6.7 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा जबरदस्त तडाखा बसला. विमानतळावरची विमानंही हलू लागली. क्षणार्धात अख्ख्या जपानची बत्ती गुल झाली.

होक्काईदो शहर गदागदा हलू लागलं. तोमाकोमाई शहरात या भूकंपाचं केंद्र होतं. भूकंपाने रस्त्यांमध्ये भेगा पडल्या. घरांचा पाया खचला. जमिनीतून पाण्याचे पाट वाहू लागले. भूकंपाने भूस्खलही सुरु झालं. झाडं थेट घरांवर येऊन कोसळली. तब्बल 40 जण यात बेपत्ता झाले आहेत.

सात वर्षांपूर्वी जपानने जगातल्या सर्वात मोठ्या त्सुनामीचा कहर भोगला आहे. पण आता आलेल्या या उलट्या सुनामीमुळे धोका आणखी वाढला आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठी जपानला वेळ लागणार आहे, हे नक्की.