वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आज भेट होणार आहे. या भेटीदरम्यान महत्त्वाच्या करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे.


पंतप्रधान मोदी व्हाईट हाऊसमध्ये पोहोचल्यावर स्वत: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांचं स्वागत करतील. यानंतर दोघांमध्ये विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा होईल.

वर्किंग डिनरचं आयोजन
व्हाईट हाऊसमध्ये आज मोदींच्या सन्मानार्थ ट्रम्प वर्किंग डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर परदेशी पाहुण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित करण्यात येणारा हा पहिला भोजन समारंभ आहे.

दोन्ही नेते दहशतवाद, भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आधुनिकीकरण, व्यापारात वाढ यावर चर्चा करतील. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याअमेरिका दौऱ्यादरम्यान भारतासाठी 22 निशस्त्र ड्रोन खरेदीच्या करारावर स्वाक्षरी करणार असल्याचं कळतं.

पंतप्रधान मोदींचा 3 देशांचा दौरा
नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर आहे. सुरुवातीला मोदी पोर्तुगालला दाखल झाले. तिथे भारतीयांना संबोधित केल्यानंतर पंतप्रधान अमेरिकेला रवाना झाले. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. अमेरिकेचा दौरा आटोपल्यानंतर ते नेदरलँड्सला जातील, तिथून ते भारतात परतणार आहेत.

मोदी-ट्रम्प भेटीवर पाकिस्तानची नजर
दरम्यान, मोदी-ट्रम्प भेटीवर पाकिस्तानची विशेष नजर आहे. कारण भेटीआधीच ट्रम्प यांनी मोदींना खरा मित्र असल्याचं सांगितलं आहे. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर अमेरिका पाकिस्तानपासून दूर आहे. आता मोदी-ट्रम्प भेटीत पाकिस्तान आणि दहशतवादाचा मुद्दा उपस्थित होणार आहे. स्वत: ट्रम्प दहशतवाद्यांविरोधात कठोर भूमिका घेतात.