PM Modi Speech France: भारतामध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाला केले. ते पॅरीसमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयावर भाष्य केले. दहशतवाद आणि कट्टरवादावरही त्यांनी भाष्य केले. परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी भारत सरकार कमिटेड असल्याचा विश्वासही यावेळी मोदींनी व्यक्त केला. फ्रान्समध्ये पोस्ट मास्टर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारताकडून पाच वर्षांसाठी पोस्ट स्टडी व्हिसा देण्यात येईल, असेही मोदींनी यावेळी सांगितले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या फ्रान्सच्या दौऱ्यावर असून त्यांचे पॅरिसमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले. तसेच पंतप्रधान मोदी यांना यावेळी गार्ड ऑफ ऑनर देखील देण्यात आला. प्रतिष्ठित ला सीन म्युझिकलमध्ये भारतीय समुदायाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.  आजचे दृश्य स्वतःच अप्रतिम आहे, हा उत्साह अभूतपूर्व आहे, हे स्वागत आनंदाने भरून जाणार आहे, असे मोदी म्हणाले. 


पंतप्रधान म्हणाले की, आपण भारतीय जिथे जातो तिथे नक्कीच मिनी इंडिया बनवतो. काही लोक 12 तासांचा प्रवास करून येथे पोहचले आहेत. यापेक्षा मोठे प्रेम काय असू शकते. इतका प्रवास करुन येथे आल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. यावेळी फ्रान्समध्ये माझं येणे अधिक विशेष आणि खास आहे.  उद्या (शुक्रवार) फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस आहे. त्यापार्श्वभूमिवर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत राष्ट्रीय दिनाच्या परेडचा भाग होणार आहे.  


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज जग एका नव्या जागतिक व्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. भारताची भूमिका झपाट्याने बदलत आहे. भारत लोकशाहीची जननी आहे. भारत मॉडेल ऑफ डायवर्सिटी ( विविधतेचा आदर्श) आहे. दहशतवाद आणि कट्टरतावादाविरोधात भारताचे प्रयत्न यशस्वी ठरले आहेत.  जगाला प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी भारताचे मदतीचे प्रयत्न आहेत.  भारताचा हजारो वर्षांचा इतिहास आहे. जागतिक कल्याणासाठी भारताच्या प्रयत्नांची व्याप्ती खूप मोठी आहे. 


यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समध्ये असणाऱ्या भारतीयांना भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, माझा तुम्हाला आग्रह आहे की, आता आपल्याला भारतात गुंतवणुकीसाठीही संपूर्ण उत्साहाने समोर यावे लागेल.  पुढील 25 वर्षांत भारत विकसित होण्याच्या दृष्टीने काम करत आहे. यामध्ये तुमची भूमीकाही मोठी आहे. आपण ज्या कोणत्या क्षेत्रात काम करत असाल. त्याच्याशी संबंधित संभावनांवर भारतात काम करा. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करा.. भारतामध्ये गुंतवणूक करण्याची मोठी संधी आहे. जो लवकर भारतात गुंतवणूक करेल, त्याला जास्त फायदा होईल. हे मी आताच सांगतोय.. पुन्हा म्हणाल सांगितले नाही. लाल किल्ल्यावरील भाषणातही मी हेच आव्हान केले होते. पुन्हा एकदा भारतात गुंतवणूक करण्याचे आव्हान करत आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, उद्या मी माझे मित्र राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत राष्ट्रीय दिनाच्या परेडचा भाग होणार आहे. हे स्नेहसंबंध केवळ दोन देशांच्या नेत्यांमधील नसून भारत आणि फ्रान्स यांच्यातील अतूट मैत्रीचे ते प्रतिबिंब आहे. भारत सध्या G20 चे अध्यक्षपद भूषावत आहे. एखाद्या देशाच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदाच असे घडत आहे की, त्या देशाच्या कानाकोपऱ्यात 200 हून अधिक सभा होत आहेत. संपूर्ण G20 गट भारताच्या क्षमतेकडे लक्ष देत आहे.


मोदींचा फ्रान्स दौरा खास, बॅस्टाईल सोहळ्यात होणार सहभागी -
फ्रान्सचे राष्ट्रपती एमन्युएल मॅक्रॉन यांच्या आमंत्रणाला मान देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या फ्रान्स दौऱ्यावर गेले आहे. पंतप्रधान मोदींचा हा दौरा खास आहे, कारण शुक्रवारी पॅरीस येथे होणाऱ्या फ्रेंच राष्ट्रीय दिवस समारंभासाठी अर्थात बॅस्टाईल दिन सोहोळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्यासोबत उपस्थित असतील. तिन्ही भारतीय सेनादलांची पथके या बॅस्टाईल दिन संचलन कार्यक्रमात सहभागी होतील, तर भारतीय हवाई दलाची विमाने या प्रसंगी हवाई कसरतीही करणार आहेत.