Pitbull Dog Attack News : जगातील सर्वात धोकादायक मानली जाणारी कुत्र्याची प्रजाती म्हणजे पिट बुल (Pit Bull). एका पिट बुलने सहा वर्षीय चिमुकलीवर जीवघणा हल्ला केला. कुत्र्याने चिमुकलीच्या चेहऱ्यावर ओरखडे काढले. या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिच्या चेहऱ्यावर 1000 टाके लावण्यात आले आहेत. शस्त्रक्रियेनंतरही चिमुकलीच्या तब्येत फार गंभीर आहे. या मुलीला आता श्वासोच्छवासासाठी ट्यूब लावण्यात आली आहे.


पिट बुलचा सहा वर्षीय चिमुकलीवर जीवघेणा हल्ला


पिट बुल जातीच्या कुत्र्याने सहा वर्षीय चिमुकलीवर जीवघेणा हल्ला केला. कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. अनेक देशांमध्ये पिटबुल पाळण्यावर बंदी आहे. अमेरिकेमध्ये (America) ही धक्कादायक घटना घडली आहे. सहा वर्षाच्या मुलीवर पिट बुल कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीला रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून तिच्या चेहऱ्यावर 1000 टाके लागले आहेत. एनबीसी-एफिलिएट डब्ल्यूएमटीवीच्या रिपोर्टनुसार, ही घटना चेस्टरविले येथील आहे. 


चिमुकलीच्या चेहऱ्यावर 1000 टाके


मीडिया रिपोर्टनुसार, 18 फेब्रुवारी रोजी लिली नावाची सहा वर्षांची मुलगी शेजाऱ्यांच्या घरी तिच्या मित्रासोबत खेळत होती. यावेळी मित्राची आई मादा पिटबुलसोबत तिथे उपस्थित होती. पिट बुलने संधी साधत लिलीवर हल्ला केला आणि तिला ओरखडायला सुरुवात केली. लिलीच्या चेहऱ्यावर चावा घेतला. या घटनेत लिली गंभीर जखमी झाली आहे. लिलीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे लिलीवर शस्रक्रिया करण्यात आली. तिच्या चेहऱ्यावर 1000 टाके लागले असून श्वासोच्छवासासाठी नळी लावण्यात आली आहे.


चिमुकलीच्या आईची प्रतिक्रिया


चिमुकलीच्या चेहऱ्यावरील त्वचेला टाके लावण्यात आले आहेत, मात्र तिचा चेहरा विद्रूप झाला आहे. लिलीची आई डोरोथी नॉर्टनने प्रतिक्रिया देत म्हटलं की, "माझ्या मुलीची ही अवस्था पाहून मी रडू थांबवण्याचा खूप प्रयत्न करत आहे, पण अश्रू ओघळत आहेत."


लिली टेबलावर बसली असताना कुत्र्याचा हल्ला


नॉर्टनने सांगितलं की, "लिली टेबलावर बसली तेव्हा कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. लिलीने स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तिचे खांदे वर केले, त्यामुळे कुत्रा तिच्या मानेला चावू शकला नाही. त्यानंतर तिच्या मैत्रिणीची आई बाथरुममधून बाहेर आली. ती बाहेर पळत सुटली कारण तिची दुसरी लहान मुलगी रडत होती. बाथरुममधून बाहेर येताच तिने कुत्र्याच्या तावडीतून लिलीची सुटका केली.


महत्त्वाच्या इतर बातम्या


भिवंडीत भटक्या कुत्र्यांची दहशत; एका दिवसात 15 हून अधिक नागरिकांवर हल्ला