Petrol Diesel Rates in Pakistan: भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानची (Pakistan) आर्थिक अवस्था बिकट होत चालली आहे. पाकिस्तानच्या जनतेला विक्रमी महागाईचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तान सरकार दररोज वस्तूंच्या किमती वाढवत असते, आता पाकिस्तानच्या सरकारने इंधनाच्या किमती वाढवल्या आहेत. पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे आणि त्यामुळे पाकिस्तानी जनतेला मोठा फटका बसतो आहे.


पाकिस्तानात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत किती वाढ?


पाकिस्तानच्या सरकारने पेट्रोलमध्ये 26 रुपये 2 पैशांनी वाढ केली आहे, तर डिझेलच्या किमतीत 17 रुपये 34 पैशांनी वाढ केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे पाकिस्तानातील जनतेला महागाईचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानच्या सरकारने जनतेला महागाईपासून दिलासा देणार असल्याचं आश्वासन दिलं. मात्र त्यानंतरही वस्तूंच्या किमती कमी होत नसून उलट्या वाढतच आहेत.


आता पेट्रोल-डिझेलच्या नवीन किमती काय?


गेल्या आठवड्यात, आर्थिक समन्वय समितीने (ECC) पेट्रोलियम डीलर्स आणि तेल विपणन कंपन्यांचे मार्जिन वाढवण्यास मंजुरी दिली होती. पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री मार्जिनमध्ये प्रति लिटर 3.5 रुपयांनी वाढ करण्यास सरकारने मंजुरी दिली. आता सरकारने इंधन दरात नुकत्याच केलेल्या वाढीमुळे पेट्रोलचे नवे दर प्रतिलिटर 331 रुपये 38 पैसे झाले आहेत. तर डिझेलचे दर 329 रुपये 18 पैसे प्रति लिटर झाले आहे.


पाकिस्तान सरकारकडून कोणता इशारा?


ईसीसीने पेट्रोल आणि डिझेल विक्री मार्जिनमध्ये वाढ मंजूर केली आहे. अशा परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार असल्याचा इशारा आधीच दिला होता. जागतिक स्तरावर वस्तूंच्या किमती सतत वाढत असल्याने पाकिस्तानात देखील महागाई वाढत असल्याचं सरकारने सांगितलं.


पाकिस्तानला काही वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. किरकोळ वस्तूही महागड्या दराने विकल्या जात आहेत. आयएमएफच्या बेलआउट फंडातून काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी महागाईत फारसा फरक पडलेला नाही.


अन्नधान्य महागाई दर 38.5 टक्क्यांवर


पाकिस्तान सातत्याने महागाईशी झुंजत आहे. पाकिस्तानातील महागाई दर दोन अंकी झाला आहे. ऑगस्टमध्ये, वार्षिक आधारावर येथे महागाई दर 27.38% होता. पाकिस्तानमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने अन्नधान्य महागाई दर 38.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. एक वर्षापूर्वी ऑगस्टमध्ये तो 6.2% होता.


हेही वाचा:


Woman Journalist Molested : लाईव्ह टीव्हीवर महिला पत्रकाराचा विनयभंग, तरुणाने आक्षेपार्ह पद्धतीने केला स्पर्श; व्हिडीओ व्हायरल