Pervez Musharraf Death : पाकिस्तानचे (Pakistan) माजी राष्ट्राध्यक्ष (Former President of Pakistan) परवेज मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचं निधन झालं आहे. पाकिस्तानच्या मीडियाच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. परवेज मुशर्रफ प्रदीर्घ काळ आजारपणामुळे त्रस्त होते. त्यांनी वयाच्या 79 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची परंतु, आज त्यांची प्रकृती जास्त खालावली असल्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे. 2016 पासून त्यांच्यावर दुबईमध्ये उपचार सुरु होते.


कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानची आगळीक जनरल मुशर्रफ यांच्याकडून करण्यात आली होती. माजी निवृत्त जनरल परवेज मुशर्रफ यांनी लष्करप्रमुख असताना बंड करून पाकिस्तानची सत्ता मिळवली. मुशर्रफ यांनी संविधान भंग करुन 3 नोव्हेंबर 2007 रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर डिसेंबर 2013 मध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. 






मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा, नंतर शिक्षा रद्द


पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच  माजी राष्ट्राध्यक्षांना अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील विशेष न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठानं फाशीची शिक्षा सुनावली होती.


दरम्यान, पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा लाहोर उच्च न्यायालयाने रद्द करण्याचा निर्णय दिला होता. देशद्रोहाच्या आरोपात इस्लामाबादच्या विशेष न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली होती. विशेष न्यायालयाने दिलेला निर्णय असंवैधानिक असल्याचं लाहोर उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. मुशर्रफ यांनी त्यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेला लाहोर उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिलं होतं.


मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा


परवेज मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुशर्रफ यांच्यावर डिसेंबर 2013 मध्ये 3 नोव्हेंबर 2007 रोजी देशात आणीबाणी लागू केल्याबद्दल आणि डिसेंबर 2007 च्या मध्यापर्यंत राज्यघटना निलंबित केल्याचा आरोप होता. याप्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 31 मार्च 2014 रोजी मुशर्रफ यांना दोषी ठरवण्यात आले होते. मुशर्रफ यांनी 1999 ते 2008 या कालावधीत त्यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख म्हणून कारभार सांभाळला. मुशर्रफ मार्च 2016 पासून दुबईत राहत होते. बऱ्याच काळापासून त्यांच्यावर दुबईत उपचार सुरू होते.


परवेज मुशर्रफ यांनी ऑक्टोबर 1999 मध्ये लष्करी बंड करून पाकिस्तानची सत्ता काबीज केली होती. मुशर्रफ 2001 ते 2008 पर्यंत पाकिस्तानचे राष्ट्राध्य होते. परवेज मुशर्रफ यांनी पाकिस्तान संविधान भंग करत नवाज शरीफ यांचं सरकार उलथवून सत्ता काबीज केली होती. पाकिस्तानच्या इतिहासातील हे पहिलं प्रकरण आहे, ज्यात एखाद्या माजी लष्कर प्रमुखावर देशद्रोहाच्या आरोपात नागरी कोर्टात खटला चालवण्यात आला.