इम्रान खान यांचा शपथविधी, सिद्धू लाहोरमध्ये दाखल
पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून इम्रान खान यांचा शपथविधीसाठी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेते नवज्योतसिंग सिद्धू काल लाहोरमध्ये दाखल झाले.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून इम्रान खान यांचा शपथविधी सोहळा आज इस्लामाबादमध्ये होत आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेते नवज्योतसिंग सिद्धू काल लाहोरमध्ये दाखल झाले.
निळा सूट आणि गुलाबी फेटा या वेशात सिद्धू अटारी-वाघा सीमामार्गानं पाकिस्तानात दाखल झाले. सिद्धू यांनी पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांना भेट म्हणून काश्मिरी शाल नेली आहे. तसेच भारताचा सदिच्छादूत या नात्यानं आपण पाकिस्तानसाठी प्रेमसंदेश घेऊन आल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी सिद्धू म्हणाले की, "मी माझ्या मित्राच्या आमंत्रणामुळे पाकिस्तानात आलो आहे. माझ्या हा क्षण खुप खास आहे. खेळाडू आणि कलाकार देशांमधील अंतर मतभेद मिटवतात. मी पाकिस्तानात प्रेमाचा संदेश घेऊन आलो आहे."
सुनील गावस्कर आणि कपिलदेव यांनाही इम्रान यांच्या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण होतं. परंतु ते दोघंही वैयक्तिक कारणास्तव या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत.
पाकिस्तान निवडणुकीत काय झालं? पाकिस्तानात 25 जुलैला 270 जागांसाठी मतदान झालं. या निवडणुकीत इमरान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाला सर्वाधिक 116 जागा मिळाल्या. इमरान यांनी स्वत: पाच जागांवर निवडणूक लढवली. या पाचही जागांवर त्यांचा विजय झाला. पाकिस्तान मुस्लीम लीगचे अध्यक्ष शहबाज शरीफ यांनी 96 जागा जिंकल्या. तर बिलावर भुट्टो जरदारी यांच्या पाकिस्ताना पीपल्स पार्टीने 54 जागा जिंकल्या.
Before You Go
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?






















