Aamir Liaquat Death : पाकिस्तानचे प्रसिद्ध टीव्ही होस्ट आणि खासदार आमिर लियाकत हुसैन यांचे निधन झाले आहे. ते 49 वर्षांचे होते. आज अमीर लियाकत हुसैन कराचीतील त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळले. "लियाकत यांची प्रकृती आज पहाटे बिघडली होती. त्यानंतर त्यांना आगा खान विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
आमिर लियाकत हुसैन यांचे शवविच्छेदन जिना पदव्युत्तर वैद्यकीय केंद्रात करण्यात येणार आहे. दरम्यान, एमएनए अमीर लियाकत हुसेन यांच्या निधनाची बातमी मिळताच राष्ट्रीय असेंब्लीचे अध्यक्ष राजा परवेझ अश्रफ यांनी आजपासून सुरू झालेले अधिवेशन शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तहकूब केले आहे.
कराचीमधून खासदार
लियाकत मार्च 2018 मध्ये पीटीआयमध्ये सामील झाले होते. त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते कराचीमधून खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र, नंतर त्यांनी पक्ष सोडला. ते यापूर्वी मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेंट (MQM) चे प्रमुख नेते होते. लियाकत अनेक वर्षे मीडिया इंडस्ट्रीत कार्यरत होते.
तीन विवाह
हुसैन हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असायचे. लक्झरी लाइफस्टाइल, आलिशान घर आणि प्रत्येक शोसाठी लाखोंची फी यामुळेही ते चर्चेत असायचे. लियाकत यांचा जन्म 5 जुलै 1972 रोजी झाला. त्यांना दोन मुले आहेत. आमिर लियाकत यांनी तीन विवाह केले होते. त्यांनी 2018 मध्ये तौबा अन्वरसोबत दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी 2022 मध्ये दानिया शाहसोबत तिसरे लग्न केले होते. दानिया शाह ही लिकायत यांच्यापेक्षा 31 वर्षांनी लहान होती. लग्नानंतर काही दिवसातच दानियाने लियाकत यांच्यापासून घटस्फोट मागितला होता.
एका शोसाठी 20 लाख रूपये
हुसैन हे 2002 ते 2007 पर्यंत पाकिस्तानचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री होते. पाकिस्तानातील सर्वात लोकप्रिय नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत नेते म्हणून त्यांना ओळखले जात असे. त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत दूरदर्शन होता. हुसैन एका टीव्ही शोसाठी सुमारे 20 लाख पाकिस्तानी रुपये घेत असत. त्यांचे शो पाकिस्तानमध्ये चांगलेच पसंत केले जात असत.