CICA Summit 2022: कझाकिस्तान (Kazakhstan) च्या अस्ताना (Astana)येथील शिखर संमेलनात युक्रेन संकटावर चर्चा सुरु होती. त्यावेळी पाकिस्तानने काश्मिर मुद्द्यावरुन पुन्हा रडगाण केलं. याला भारताच्या परराष्ट्र मत्रालयाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. 


अस्ताना (Astana) येथे सहाव्या शिखर संमेलनात परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी (Meenakshi Lekhi) यांनी पाकिस्तान (Pakistan) च्या काश्मीर (Kashmir)  मुद्द्याला रोखठोख प्रत्युत्तर दिलं आहे. गुरुवारी (13 ऑक्टोबर) रोजी आयोजित शिखर संमेलनात अनेक जागतिक नेत्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये युक्रेन संकटासह अनेक मुद्द्यावर चर्चा झाली. 


पाकिस्ताननं काय म्हटलं?
कझाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या शिखर संमेलनात संबोधित करताना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी काश्मीर मुद्द्यावरुन भारतावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भारत सरकारवर (GOI) कश्मीरमधील लोकांवर आत्याचाराचा आरोप लावला.  शरीफ यांनी आपल्या संबोधनात म्हटले की, काश्मीर मुद्द्यावर भारतासोबत चर्चा करण्यास इच्छूक होतो. पण अर्थपूर्ण आणि परिणामकारक चर्चेसाठी दिल्लीत सरकारची तयारी नाही. त्यांनाही यासाठी पुढाकार घ्यावा... 


भारताचं पाकिस्तानला प्रत्युत्तर -
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या आरोपाला परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.  त्या म्हणाल्या की,  भारताच्या अंतर्गत प्रश्नावर टिप्पणी करण्याचा पाकिस्तानला कोणताही अधिकार नाही. पाकिस्तानकडून आज आलेलं वक्तव्य भारताच्या अंतर्गत प्रश्नावर, प्रदेशिक अस्मिता आणि सार्वभौमत्व यामध्ये हस्तक्षेप आहे. 


पाकिस्तानला दहशतवाद्याचं जागतिक केंद्र म्हणून ओळखलं जातं, असे म्हणत लेखी म्हणाल्या की, 'शेजारी असणारा देश भारतातील दहशतवाद्यांच्या कारवायांचा केंद्र आहे.  पाकिस्तान मानव विकासात कोणतीही गुंतवणूक करत नाही. पण दहशतावदासाठी पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी आणि देखरेख करण्यासाठी संसाधने उपलब्ध करून देत आहे. '
 
CICA शिखर परिषद मंचाचा पाकिस्तानकडून दुरुपयोग - 
भारताच्या परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, 'पाकिस्ताननं भारताविरोधात खोट्या आरोपांचा प्रचार करण्यासाठी पुन्हा एकदा CICA शिखर परिषदेचा वापर केला, हे दुर्भाग्यपूर्ण आहे. पाकिस्तानने CICA शिखर परिषदेच्या मंचावरुन सदस्य देशांना मुख्य विषयावरुन ध्यान भरकटवण्याचा प्रयत्न केलाय. जम्मू काश्मीर आणि लडाख भारताचा अविभाज्य घटक आहे आणि राहणार. पाकिस्तानने आमच्या अंतर्गत प्रकरणामध्ये ढवळाढवळ करु नये.'
  
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या पीओजेकेएलमध्ये सातत्यानं गंभीर आणि मानवाधिकारांचं उल्लंघन होणाऱ्या घटना होत आहेत. या घटनांना रोखण्यासाठी हे पाऊल महत्वाचं ठरणार आहे. अवैध पद्धतीनं भारताच्या ठिकाणावर कब्जा केलले क्षेत्र पाकिस्ताननं तात्काळ खाली करावीत, असे लेखी म्हणाले. भारत पाकिस्तानसह शेजारील सर्व देशांसोबत सामान्य संबंध ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असल्याचेही लेखी यांनी यावेळी सांगितलं.