Alex Jones on Sandy Hook victims : अमेरिकेतील विकृत षड्यंत्रकारी अॅलेक्स जोन्सला 2012 च्या सॅंडी हूक शाळेतील गोळीबारातील पीडितांच्या कुटुंबीयांना 965 मिलियन डाॅलर (जवळपास 80 कोटी रुपये) नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. जोन्सने ही घटना घडूनही ती फसवी होती असेच भासवण्याचा प्रयत्न केला होता. डिसेंबर 2012 मध्ये सँडी हूक एलिमेंटरी स्कूलमध्ये एका माथेफिरून बंदुकधाऱ्याने 20 मुलांसह सहा कर्मचार्‍यांची हत्या केली होती. वॉटरबरी, कनेक्टिकट येथील राज्य न्यायालयात तीन आठवड्यांच्या सुनावणीवनंतर बुधवारी हा निकाल आला. ऑगस्टमध्ये अशाच एका प्रकरणात टेक्सास ज्युरीने जोन्सला 49 मिलीयन डाॅलर जोन्सला पीडित कुटुंबांना देण्याचे आदेश दिले होते.


घटना घडलीच नसल्याचा प्रचार 


जोन्सने वर्षानुवर्षे अथकपणे हत्याकांड घडलेच नाही, असा प्रचार केला होता. तसेच या घटनेतील बातम्यांच्या कव्हरेजमध्येही पीडित कुटूंब अमेरिकन लोकांच्या बंदुका हिसकावून घेण्याच्या कटाचा भाग म्हणून अभिनेते नियुक्त केल्याचा जावईशोधही त्याने लावला होता. कनेक्टिकटमधील खटल्यात अनेक कुटुंबांनी गेल्या तीन आठवड्यांपासून पुरावे सादर केले होते. त्यामुळे जोन्सचा खोटारडेपणा सातत्याने उघडा होत गेला. गोळीबाराला प्रतिसाद देणारा एफबीआय एजंट देखील या प्रकरणात फिर्यादी होता.


गेल्या आठवड्यात शेवटच्या युक्तिवाद दरम्यान, आठ सँडी हुक पीडितांच्या कुटुंबियांच्या वकिलांनी सांगितले की, जोन्सने हत्याकांडाबद्दल अनेक वर्षे खोटे बोलला, ज्यामुळे त्याच्या इन्फोवर्स वेबसाइटवर ट्रॅफिक आले आणि त्याच्या विविध उत्पादनांची विक्री वाढली. पीडित कुटुंबांना जोन्सच्या समर्थकांकडून छळ आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचा दशकभराचा त्रास सहन करावा लागला, असेही वकील ख्रिस मॅटेई यांनी सांगितले.


जोन्सचे वकील, नॉर्मन पॅटिस यांनी त्यांच्या समापन युक्तिवादाच्या वेळी प्रतिवाद केला की फिर्यादींनी तुटपुंजे पुरावे दाखवले होते आणि न्यायाधीशांना खटल्यातील राजकीय अंडरकरंट्सकडे दुर्लक्ष करण्याचा दावा केला. 


पीडित कुटुंबांना बलात्काराच्या धमक्या 


सँडी हूक पीडितांच्या इतर पालकांनी आणि भावंडांनी गेल्या आठवड्यांमध्ये कनेक्टिकट न्यायालयात सांगितले की जोन्सच्या शोमध्ये सांगितलेल्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांकडून त्यांना वर्षानुवर्षे धमकावले गेले आणि त्रास दिला गेला. सोशल मीडियावर लोकांनी अपमानास्पद प्रतिक्रिया दिल्या. हत्या झालेल्या सँडी हूक प्रिन्सिपल डॉन हॉचस्प्रंग यांची मुलगी एरिका लॅफर्टी हिने साक्ष दिली की लोकांनी तिच्या घरी बलात्काराच्या धमक्या दिल्या. दरम्यान, गोळीबारात मारल्या गेलेल्या दुसर्‍या मुलाच्या पालकांनी दाखल केलेल्या खटल्यात जोन्सला आता वर्षाच्या अखेरीस टेक्सासमध्ये तिसऱ्या खटल्याचा सामना करावा लागेल.