Pakistan Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान (Imran Khan) यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (Election Comission) सोमवार (24 जुलै) रोजी इम्रान खान यांच्याविरोधात अवमानना केल्याप्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. निवडणूक आयोगाने यापूर्वी इम्रान खान यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण इम्रान खान यांनी निवडणूक आयोगापुढे हजेरी लावली नाही. यानंतर निवडणूक आयोगाने पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांच्या अटकेची जबाबदारी इस्लामाबादच्या पोलीस महानिरीक्षकांवर सोपवली आहे.


असभ्य भाषा वापरल्याचा इम्रान यांच्यावर आरोप


पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने मागील वर्षी इम्रान खान यांच्यासह त्यांच्या पक्षाचे माजी नेते असद उमर आणि फवाद चौधरी यांच्याविरोधात मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोगाविरुद्ध असभ्य भाषा वापरल्याबद्दल मानहानीचा कारवाई सुरु केली होती. निवडणूक आयोगाचे सदस्य दुर्रानी यांच्या नेतृत्वाखाली चार न्यायधीशांच्या खंडपीठाने 11 जुलै रोजी झालेल्या सुनावणीमध्ये इम्रान खान यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. खंडपीठाने या प्रकरणात पुढील सुनावणीसाठी 25 जुलैची तारीख दिली होती. 


निवडणूक आयोगासमोर हजर राहण्यात अयशस्वी


पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने नवीन आदेशात म्हटलं आहे की, 16 जानेवारी आणि 2 मार्च रोजी इम्रान खान यांना नोटीस आणि जामीनपात्र वॉरंट जारी केल्यानंतरही त्यांनी आयोगासमोर हजेरी लावली नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने सकाळी दहा वाजेपर्यंत इम्रान खान यांना अटक करुन हजर करण्याचे आदेश दिले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना इम्रान खान यांनी म्हटलं की, या सगळ्यामागे गृहमंत्र्यांचं षडयंत्र आहे. 


इम्रान खान यांनी काय म्हटलं?


इम्रान खान यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, "हे सगळं मला बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी आणखी एक वॉरंट काढले आहे." तर पाकिस्तानच्या एका कोर्टात इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी, दोन बहिणी आणि एका विरोधात सुनावणी पार पडली आहे. यामध्ये दोघी बहिणी आणि नातेवाईकांना फरार घोषित करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.



हे ही वाचा :