India Tour Of West Indies : भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला आहे. पाचव्या दिवशी सकाळपासूनच पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे पावसाने हजेरी लावली. दोन सत्रांचा खेळ संपला तरी पावसान थांबायचं नाव घेतले नाही. त्यानंतर अखेर पंचांनी सामना अनिर्णित घोषित केला. अखेरच्या दिवशी वेस्ट इंडिजला विजयासाठी  289 धावांची गरज होती. भारताने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 365 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरदाखल वेस्ट इंडिजच्या संघाने 32 षटकांत 2 बाद 76 धावांपर्यंत मजल मारली होत. अखेरच्या दिवशी भारताला आठ विकेट तर विडिंजला  289 धावा हव्या होत्या. पण पावसाने सामन्यात ख्वाडा घातला. त्यामुळे अनिर्णित ठेवावा लागला. 


दोन सामन्याची मालिका भारताने १-० च्या फरकाने जिंकली. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि १४१ धावांनी विजय मिळवला होता. दुसरा सामना जिंकून क्लिन स्वीप करण्याचे भारताचे प्रयत्न पावसामुळे अपुरे राहिले. दुसरा सामना अनिर्णित राहिल्यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दोन्ही संघाला चार चार गुण देण्यात आलेय. आता भारतीय संघ पाच महिन्यापर्यंत एकही कसोटी सामना खेळणार आहे. २७ जुलैपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. 






वेस्ट इंडिजविरोधात पदार्पण करणाऱ्या यशस्वी जयस्वाल, ईशान किशन आणि मुकेश कुमार यांनी प्रभावित केले. यशस्वी जयस्वाल याने पहिल्या कसोटी सामन्यात दीडशतक झळकावले तर दुसऱ्या कसोटी सामन्यात अर्धशतकी खेळी केली. ईशान किशन याने दुसऱ्या कसोटीत वेगवान अर्धशतक ठोकले. मुकेश कुमार यानेही प्रभावी मारा केला. गोलंदाजीत आर. अश्विन, मोहम्मद सिराज आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रभावी मारा केला. अश्विन याने सर्वाधिक विकेट घेतल्या. तर जाडेजा आणि सिराज यांनी त्याला चांगली साथ दिली. फलंदाजीत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी धावांचा पाऊस पाडला. रोहित शर्माने तीन डावात दोन अर्धशतके आणि एक शतक झळकावले. तर विराट कोहलीने दोन डावात एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. 


यांनी केले निराश -


वेस्ट इंडिजविरोधातील दोन्ही कसोटी सामन्यात उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि सलामी फलंदाज शुभमन गिल यांना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. अजिंक्य रहाणेला दोन्ही कसोटीत दुहेरी धावसंख्याही ओलांडता आली नाही. पहिल्या कसोटीमध्ये अजिंक्य रहाणे फक्त तीन धावा काढून बाद झाला होता. दुसऱ्या कसोटीमध्ये अजिंक्य रहाणे याला फक्त आठ धावाच करता आल्या. दोन कसोटीत दोन डावात अजिंक्य रहाणे याला फक्त ११ धावा करता आल्या. शुभमन गिल यानेही निराशाजनक कामगिरी केली. शुभमन गिल याला पहिल्या कसोटीत फक्त सहा धावांचे योगदान देता आले. गिल याने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात दहा धावा केल्या तर दुसऱ्या डावात २९ धावांचे योगदान दिले. गिल याला दोन कसोटीतील तीन डावात ४५ धावा करता आल्या. गोलंदाजीत जयदेव उनादकट याने निराश केले, उनादकटला विकेट घेण्यात अपयश आले.