Pakistan PM Imran Khan : पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय अस्थिरता आहे. पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने इम्रान खान यांच्याविरोधात निकाल दिला तर, दुसरीकडे नियाजीच्या विरोधात घोषणाबाजी झाली. पाकिस्तानच्या संसदेत विश्वासदर्शक ठराव आल्यानंतर विरोधी पक्षांनी इम्रान खान यांच्याविरोधात 'गो नियाजी, गो नियाजी'ची घोषणाबाजी करण्यात आली.  विरोधी पक्षांनी नियाजी यांचे नाव घेऊन इम्रान खान यांना का डिवचण्यात आले, नियाजी प्रकरण आहे तरी काय? हे जाणून घेऊयात...


पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे आपले नाव फक्त इम्रान खान असेच ठेवतात. त्यांचे मूळ नाव इम्रान अहमद खान नियाजी आहे.  खान यांना विरोधी पक्ष नियाजी खान म्हणून चिडवतो. या नावाचा संदर्भ 1971 च्या बांगलादेश युद्धासोबत येतो. त्यावेळी पूर्व पाकिस्तानच्या सैन्याची धुरा ज्या लेफ्टिनेंट जनरलच्या हाती होती, त्यांचे नाव जनरल आमिर अब्दुल खान नियाजी होते. 


भारत-पाकिस्तानमध्ये 1971 मध्ये झालेल्या युद्धात पाकिस्तानची फाळणी झाली आणि बांगलादेश स्वतंत्र झाला. पूर्व पाकिस्तान हा बांगलादेश म्हणून नवीन देश म्हणून जगाच्या नकाशावर आला. या युद्धात पाकिस्तानला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. जनरल नियाजीने ढाकामध्ये आपल्या 92 हजार सैनिकांसह भारतासमोर शरणागती पत्करली. 


जनरल नियाजी यांनी भारतासमोर स्वीकारलेली शरणागती ही पाकिस्तानला आजही अपमानास्पद गोष्ट वाटते. 1971 च्या युद्धानंतर पाकिस्तानमध्ये नियाजी हे नाव एखाद्या शिवीसारखे वापरण्यात येऊ लागले आहे. नियाजी हा शब्द कमकुवत नेतृत्व आणि भ्याडपणा यासाठी वापरला जाऊ लागला. 


त्याच्याच परिणाम म्हणून इम्रान खान हे आपल्या आडनावात नियाजी हा शब्द वापरत नाही. मात्र, विरोधी पक्षाकडून सुरू असलेली शेरेबाजी, टोमणे यामुळे वैतागलेल्या इम्रान खान यांनी विरोधकांना सुनावले होते. त्यावेळी त्यांनी म्हटले की, माझं नाव इम्रान अहमद खान नियाजी आहे. त्यामुळे माझ्या पूर्ण नावाचा उल्लेख करावा. इम्रान खान यांनी आपल्या नावातून नियाजी हे नाव वापरणे सोडला असेल. मात्र, 'नियाजी'ने इम्रान खान यांचा पाठलाग सोडला नाही.