लाहोर: इम्रान खान सत्तेत असतील तर पाकिस्तानसोबत संबंध तोडण्याचा इशारा अमेरिकेने दिला असल्याचा थेट आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. आपली सत्ता घालवण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, पाकिस्तानला अस्थिर करण्यासाठी ज्या कारवाया सुरू आहेत त्यामागे अमेरिकेचा हात असल्याचा आरोपही इम्रान खान यांनी केला आहे. यावेळी आपण राजीनामा देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. इम्रान खान यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला असल्याने ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. 


जर इम्रान खान सत्तेतून गेले तर पाकिस्तानला माफ करण्यात येईल. जर ते सत्तेत असतील तर पाकिस्तानला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल असा इशारा अमेरिकेने पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांना दिला असल्याचा दावा इम्रान खान यांनी केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांना या संबंधीचे कागदपत्रे हाती लागली असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 


मी प्रामाणिक नसतो तर राजकारणात का आलो असतो? देशासाठी काहीतरी करण्यासाठीच मी राजकारणात आलो आहे असं इम्रान खान म्हणाले. या रविवारी पाकिस्तान कोणत्या बाजूला असेल याचा फैसला होणार आहे आणि त्यावेळी प्रत्येक गद्दाराचा चेहरा जनता लक्षात ठेवेल असं इम्रान खान म्हणाले.


मी ना झुकणार, ना जनतेला झुकू देणार
इम्रान खान म्हणाले की, "सध्या पाकिस्तान एका वेगळ्याच संकटातून जात असून पाकिस्तानचे नाव खराब होत आहे. अमेरिकेच्या नादाला लागून युद्धात भाग घेतल्याने पाकिस्तानची फरफट झाली. ज्यांच्यासोबत आपण लढलो, त्यांनीच आपल्यावर निर्बंध लावले. पाकिस्तानने दिलेल्या कुर्बानीबद्दल कुणी आभार मानले का? पाकिस्तानवर ड्रोन हल्ले करण्यात आले, त्यावर कुणी काही बोललं का? आता पाकिस्तानला अस्थिर करण्यासाठी अमेरिका काम करत आहे. पण मी झुकणार नाही आणि जनतेला झुकू देणार नाही."


पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण हे भारत किंवा अमेरिकेच्या विरोधात कधीही नव्हतं, ते पाकिस्तानच्या हितसंबंधांची जपणूक करण्यासाठी होतं असं इम्रान खान म्हणाले. आम्ही युद्धात सोबत नाही तर शांतता राखण्यामध्ये सोबत असल्याचं आपण अमेरिकेला सांगितल्याचं इम्रान खान म्हणाले.


अविश्वास ठरावावर चर्चा नाही
पाकिस्तानी नॅशनल असेंब्लीच्या उपसभापतींनी अविश्वास प्रस्तावावर चर्चा होण्यापूर्वीच सभागृह तहकूब करण्याचा निर्णय घेतला आहे. अविश्वास प्रस्तावावर 3 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आज इम्रान खान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार होती. मात्र ही चर्चा टळल्याने पंतप्रधान इम्रान खान यांना 72 तासांचा अतिरिक्त कालावधी मिळाला आहे. सभागृह तहकूब केल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी निदर्शने करत संसदेत 'इम्रान गो' अशा घोषणा दिल्या. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -


 


ABP Majha