लाहोर: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला असून त्यामुळे त्यांच्या सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत. विरोधी पक्षांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्याआधी इम्रान खान हे देशाला संबोधित करणार असल्याची माहिती पाकिस्तानचे मंत्री फवाद खान चौधरी यांनी दिली आहे. 


फवाद खान यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, "पंतप्रधान इम्रान खान आज राष्ट्राला संबोधित करणार आहेत. इम्रान खान यांच्यावरील त्यांचे हे ट्वीट अशा वेळी आलं आहे की ज्यावेळी पाकिस्तानची संसद ही अविश्वास ठरावासाठी तयार आहे."


 




पाकिस्तानच्या जीओ टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या संसदेने अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी बुधवारी रात्री एक आदेश जारी केला आहे. त्या आधी सोमवारी पाकिस्तान मुस्लिम लिगचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला होता. त्यावरून इम्रान खान हे बुधवारीच राष्ट्राला संबोधित करणार होते, पण ऐनवेळी ते रद्द केल्याची माहिती देण्यात आली. 


पाकिस्तानमधील राजकीय गणित
पाकिस्तानच्या संसदेमध्ये एकूण 342 सदस्य आहेत. त्यामध्ये बहुमतासाठी 172 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. एमक्यूएम या पक्षाने इम्रान खान यांचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर विरोधी पक्षाकडे आता 177 सदस्य संख्या झाली असून इम्रान खान यांनी बहुमत गमावल्याची स्थिती आहे. इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला असून विरोधी पक्षांकडे त्यासाठीचा 172 हा बहुमताचा आकडा आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -


 


ABP Majha