Pakistan Blast in Mosque : पाकिस्तानमधील पेशावरमध्ये सोमवारी मशिदीमध्ये तालिबानी दहशतवाद्याने आत्मघाती हल्ला घडवला होता. या हल्ल्यातील मृताची संख्या 100 वर पोहचली आहे. तर जखमींची संख्या 150 पेक्षा जास्त आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, मृताची संख्या आणखी वाढू शकते. सोमवारी दुपारच्या वेळी मशिदीमध्ये लोक नमाज अदा करत होते, त्यावेळी दहशतवाद्याने स्वत:ला बॉम्बने उडवले. यावेळी मशिदीमध्ये 400 ते 500 जण उपस्थित होते. मृत आणि जखमींमध्ये पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
पेशावरमधील कडेकोट सुरक्षाव्यवस्था असलेल्या पोलीस वसाहत (Peshawar Police Lines Area) परिसरातील मशिदीत दहशतवाद्यानं बॉम्बस्फोट केला. सोमवारी नमाजासाठी 400 पेक्षा जास्त नागरिक जमले होते, त्यावेळीच तालिबानी आत्मघाती हल्लेखोराने हा बॉम्बस्फोट घडवला, अशी माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली. मशिदीत पोलीस, सैनिक आणि बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाचे कर्मचारी दुपारचा नमाज अदा करत होते. यावेळी पुढच्या रांगेतील आत्मघाती हल्लेखोराने बॉम्बस्फोट घडवला, असेही तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. या हल्ल्यात आतापर्यंत 100 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 150 पेक्षा जास्त जण जखमी आहेत. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, मशिदीमध्ये स्वत:ला बॉम्बने उडवून घेणाऱ्या हल्लेखोराचं शीर मिळालं आहे.
या हल्ल्याची अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं जबाबदारी घेतलेली नाही. पण या हल्ल्यामागे तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) हा गट असल्याचा अंदाज आहे. टीटीपी ने 2009 मध्ये लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला होता. तर 2008 मध्ये इस्लामाबादमधील मॅरियट हॉटेलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटासह इतर हल्ल्यांमागे हाच गट होता. 2014 मध्येही याच गटाने पेशावर शहरातील सैनिकी शाळेवर हल्ला केला होता. या बॉम्बस्फोटात 131 निराधार विद्यार्थ्यांसह 150 जणांचा मृत्यू झाला होता.
सोमवारी झालेल्या बॉम्बस्फोटात मशिदीचा एक भाग कोसळला होता. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती आहे. सुरक्षेमध्ये अक्षम्य चूक झाल्याची कबुली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. पेशावर पोलीस अधिकारी मोहम्मद एजाज खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आणि बचाव पथकाकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. मशिदीमध्ये सध्या बचावकार्य सुरू आहे. त्याशिवाय जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
22 वर्षात किती हल्ले ?
इतर देशात आत्मघाती हल्ले करणाऱ्या पाकिस्तानमध्येच दहशतवादी हल्ले होत आहे. गेल्या काही दिवसांत पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 22 वर्षात पाकिस्तानमध्ये 16 हजार दहशतवादी हल्ले झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 29 हजार नागरिकांना जीव गमावावा लागलाय. तर अनेकजण जखमी झाले आहेत.