मुंबई : पाकिस्तानातील (Pakistan) कराचीमधील (Karachi) रशीद मिन्हास रोडवर असलेल्या आरजे मॉलमध्ये आज म्हणजेच शनिवार 25 नोव्हेंबर रोजी भीषण आग लागली. या आगीत 9 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आलीये. कराचीतील स्थानिक रुग्णालये आणि पोलिसांनी डॉन न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयांमध्ये 9 मृतदेह आणण्यात आले आहेत. आठ मृतदेह जिना पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल सेंटर जेपीएमसी आणि एक मृतदेह सिव्हिल हॉस्पिटल कराची (CHK) येथे आणण्यात आले. ते पुढे म्हणाले की, 18 वर्षीय जखमी मुलीला नुकतेच कराचीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
या संपूर्ण घटनेचा अहवालही कराचीच्या मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला आहे. वृत्तानुसार, जिल्हा उपायुक्त अल्ताफ शेख यांनी सांगितले की आग लागल्यानंतर 22 लोकांना मॉलमधून वाचवण्यात यश आले. दरम्यान यामध्ये जखमी झालेल्यांना जिना पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल सेंटर जेपीएमसीमध्ये हलवण्यात आले. पण यामध्ये उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. परिस्थिती पाहून चौथ्या मजल्यापर्यंत इमारत रिकामी करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
सकाळी 6.30 वाजता लागली आग
शरिया फैसल स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) राजा तारिक मेहमूद यांनी डॉन न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, ज्या इमारतीला आग लागली ती मोठी व्यावसायिक इमारत होती. इमारतीच्या आत शॉपिंग सेंटर्स, कॉल सेंटर्स आणि सॉफ्टवेअर हाऊस होते. अग्निशमन आणि बचाव विभागाच्या प्रवक्त्याने एका निवेदनात सांगितले की, त्यांना सकाळी 6:30 वाजता घटनेची माहिती मिळाली, त्यानंतर त्यांनी 8 अग्निशमन दल, दोन स्नॉर्कल्स आणि दोन बाउझर घटनास्थळी पाठवले आणि आग आटोक्यात आणण्यात आली. सिंधचे महानिरीक्षक (आयजी) रिफत मुख्तार यांनी जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षकांना इमारतीत अडकलेल्या लोकांना वाचवण्याच्या सूचना दिल्या होत्या. अग्निशमन दलाला कोणतीही अडचण न होता तेथे पोहोचता यावे यासाठी रस्ता मोकळा करण्याचे आदेशही त्यांनी दिले होते.
कराचीच्या 90 टक्के इमरतींमध्ये अग्निविरोधक सुविधा नाही
सिंधचे कार्यवाहक मुख्यमंत्री मकबूल बकर यांनी या घटनेची दखल घेत जखमींना तातडीने वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या मृत्यूबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला. अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे निर्देश त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले. जीवित आणि मालमत्तेची जबाबदारी सरकारची आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान या आठवड्याच्या सुरुवातीला सरकारने महत्त्वाच्या शहरांमधील इमारींमध्ये तपासणी केली असता, शहराच्या जवळपास 90 टक्के इमारतींमध्ये अग्निविरोधक सुविधा नसल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा :
Israel Hamas : हमासने 13 इस्रायली ओलिसांची सुटका केली, थायलंडचे 12 नागरीकही मुक्त