इस्लामाबाद : पाकिस्तानला मित्र देश मलेशियाने जोरदार धक्का दिला आहे. मलेशियाने पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे (पीआईए) बोईंग 777 हे विमान जप्त केले आहे. हे विमान पाकिस्तानने मलेशियाकडून भाडे तत्त्वार घेतले होते. विमानाचे भाडे थकवल्यामुळे मलेशियाने ही कारवाई केली आहे. तसेच विमानात बसलेल्या प्रवाशांना देखील उतरवण्यात आले.
पाकिस्तानच्या मीडिया रिपोर्टसच्या माहितीनुसार, क्वालालंपूर एअरपोर्टवर ही घटना घडली आहे. एअरपोर्टवर विमानात बसलेल्या प्रवाशांसह कर्मचाऱ्यांचा अपमान करत त्यांना विमानातून उतरवण्यात आले आहे.
पाकिस्तान पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सने(पीआईए) या संदर्भात ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये पीआईए म्हणाले, मलेशियाच्या स्थानिक कोर्टाच्या आदेशावरून हे विमान ताब्यात घेण्यात आले असून ही एकतर्फी कारवाई आहे. पीआयई आणि अन्य पक्षकारांमध्ये यूके कोर्टात सुनावणी सुरू आहे.
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सकडे एकूण 12 बोइंग 777 विमाने आहे. पाकिस्तानच्या डेली टाईम्स या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार वेगवगळ्या कंपन्यांकडून ही विमाने ड्राय लीजवर घेण्यात येतात. मलेशियाने जप्त केलेले विमान हे देखील त्यापैकी एक आहे. मलेशियाचे विमान देखील भाडे तत्त्वावर घेण्यात आले होते. परंतु त्याचे नियमीत भाडे न भरल्याने क्वालालंपूर एअरपोर्टवर हे विमान जप्त करण्यात आले आहे.
याआधी पाकिस्तानचा अत्यंत जवळचा मित्र सौदी अरेबियाने देखील आपले 3 अरब डॉलर्स पाकिस्तानकडे मागितले होते. सौदी अरेबियाचे हे कर्ज फेडण्यासाठी चीनने पाकिस्तानला आर्थिक मदत केली होती.