Imran Khan Resignation: पाकिस्तनामध्ये राजकीय संकट वाढताना दिसत आहे. याच दरम्यान इम्रान खान पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि आयएसआयचे महासंचालक (डीजी) लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम हे इम्रान खान यांना भेटायला पोहोचले आहेत. यानंतर इम्रान हे आता राजीनामा देणार असं बोललं जात आहे.  


अशातच पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी म्हणाले आहेत की, ''राजीनाम्याचा प्रश्नच नाही, इम्रान खान शेवटच्या चेंडूपर्यंत लढतील.'' आपले सरकार पाडण्यासाठी परदेशातून षडयंत्र रचले जात असल्याचा दावा इम्रान खान यांनी नुकताच केला होता. पुरावा म्हणून त्याच्या दाव्यांचे पुष्टी करणारे पत्र देखील त्यांच्याकडे असल्याचे ते म्हणाले होते. याच पत्राबद्दल बोलताना शेख रशीद म्हणाले की, ''इम्रान खान संध्याकाळी देशाला संबोधित करतील. या दरम्यान, आपण पत्राबद्दल बोलू.'' फवाद चौधरी यांनी देखील दावा केला आहे की, इम्रान खान शेवटच्या चेंडूपर्यंत खेळणारा खेळाडू आहे, राजीनामा देणार नाही. मैदान भरणार. मित्रही पाहतील आणि शत्रूही पाहतील.


पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते आणि पीएमएल-एनचे नेते शाहबाज शरीफ यांनी आज पुन्हा एकदा इम्रान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. इम्रान खान यांनी बहुमत गमावले असून  त्यांनी राजीनामा द्यावा, असे शरीफ म्हणाले.


इम्रान खान हे आघाडी सरकारचे नेतृत्व करत आहेत. दरम्यान, कायदा मंत्री फारुख नसीम आणि आयटी मंत्री अमिनुल हक यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. दोन्ही नेते इम्रान सरकारचा मित्रपक्ष असलेल्या एमक्यूएमचे आहेत. दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 25 मार्च रोजी विरोधी पक्षांनी खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. पाकिस्तानच्या 342 सदस्यीय नॅशनल असेंब्लीमध्ये खान यांच्या पक्षाचे 155 सदस्य आहेत आणि त्यांना सत्तेत राहण्यासाठी किमान 172 खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.