लाहोर: रशिया-अमेरिकेमध्ये तणाव असताना, अमेरिकेने निर्बंध लादले असतानाही भारत रशियाकडून कच्च्या तेलाची आयात करतोय, आणि पाकिस्तानी सरकार मात्र गुलामासारखं वागत असून नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यात अपयशी ठरत असल्याची घणाघाती टीका पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Imran Khan) यांनी शहबाज शरीफ सरकारवर केली आहे. पाकिस्तानी सरकारच्या विरोधात इम्रान खान यांनी लाहोर ते इस्लामाबाद अशा 'लॉंग मार्च'चे (Long March) आयोजन केलं आहे. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भारतीय परराष्ट्र धोरणाचं जाहीर कौतुक केलं आहे. तसेच मला जास्त बोलायला लावू नका अशा इशाराही त्यांनी आयएसआयच्या (ISI) प्रमुखांना दिला आहे.
इम्रान खान (Imran Khan) म्हणाले की, "पाकिस्तानमध्ये सुरु असलेला ड्रामा लोक पाहत आहेत. देशातील महागाईने भीषण रुप धारण केलंय. सरकारमधील चोरांनी घेतलेल्या निर्णयाचा फटका सामान्य नागरिकांना बसतोय. मात्र देशातील वेगवेगळ्या घोटाळ्यात सामील असलेले सरकारमधील लोक मात्र निर्दोष सुटले आहेत. अमेरिकेने कितीही निर्बंध लादले तरीही भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करु शकतो, मात्र त्याचवेळी पाकिस्तानी सरकार मात्र गुलामासारखं वागत असून आपल्या नागरिकांच्या कल्याणासाठी ते अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाहीत हे दुर्दैव आहे."
आयएसआयच्या प्रमुखांना इशारा
आयएसआयचे (ISI) प्रमुख लेफ्टनंट जनरल नदीम अहमद अंजूम यांनी दोन दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन इम्रान खान यांच्यावर टीका केली होती. इम्रान खान यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बावजा यांना सरकरा उलथवून टाकण्यासाठी आकर्षक ऑफर दिली होती असा आरोप त्यांनी केला होता. त्याला उत्तर देताना इम्रान खान म्हणाले की, मला खूप काही गोष्टी माहिती आहेत. मला तोंड उघडायला लावू नका. मी देशाचं हित लक्षात घेऊन शांत बसतोय, मला जास्त बोलायला लावू नका.
लाँग मार्चच्या माध्यमातून इम्रान खान यांनी सरकारविरोधात मोर्चा खोलला असून देशातील निवडणुका लवकरात लवकर घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. त्यांच्या या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी लाहोर या ठिकाणी हजारो लोकांनी गर्दी केली आहे. या मोर्चाचं स्वरुप पाहता इस्लामाबादमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
या आधीही भारताची स्तुती
रशिया-युक्रेन युद्धाला सुरूवात झाल्यानंतर अमेरिकेने रशियासोबत व्यापार करण्यावर निर्बंध घातले होते. याचा फटका पाकिस्तानसह जगभरातल्या अनेक देशांना बसला. पण भारताने आपल्या भूमिकेवर ठाम राहत रशियाकडून कच्चा तेलाची आयात सुरूच ठेवली. त्यावेळी इम्रान खान यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचं कौतुक केलं होतं. अमेरिकेच्या वाढत्या दबावाला न झुगारता भारताने ही भूमिका घेतली, मग पाकिस्तान ही भूमिका का घेऊ शकत नाही असा सवालही त्यांनी विचारला होता.