Pakistan Mob lynching Case :  दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानात एक अघोरी असं तालिबानी कृत्य घडलंय. एका समूहानं पाकिस्तानी मजुरांनी श्रीलंकन मॅनेजरचे हात-पाय तोडून त्याला जिवंत जाळलंय. पाकिस्तानातील सियालकोटमध्ये हा धक्कादायक प्रकार काल दुपारी घडला आहे. 


पाकिस्तानी क्रिकेट टीमचं साहित्य बनवणाऱ्या कारखान्यातील मजुरांनी हे अमानवीय कृत्य केलं. याप्रकरणी 100 जणांना अटक केली आहे. जमावाच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या श्रीलंकन व्यक्तीचं प्रियांथा कुमारा असं नाव आहे. प्रियांथा यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर लावलेलं धार्मिक पोस्टर फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकलं. त्यामुळे फॅक्टरीतील मजुरांसह भडकलेल्या जमावानं हे संतापजनक कृत्य केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे.  

या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जगभरातून पाकिस्तानविरोधात प्रचंड रोष पाहायला मिळतोय. पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खाननंही घटनेची निंदा करत पंतप्रधान इम्रान खान यांना सवाल विचारला आहे. न्याय द्या आणि पाकिस्तानला धर्मांध लोकांपासून मुक्त करण्याची विनंती केली आहे.






या प्रकरणाची दखल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील घेतली आहे. त्यांनी ट्वीट करत दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं म्हटलंय. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, सियालकोटमधील कारखान्यावर झालेला भीषण हल्ला आणि श्रीलंकेच्या व्यवस्थापकाला जिवंत जाळणे हा पाकिस्तानसाठी लाजिरवाणा दिवस आहे. मी स्वत: या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. या प्रकरणातील तपासात कोणतीही चूक होऊ देणार नाही. सर्व दोषी व्यक्तींना कठोर शिक्षा केली जाईल. अटकेची कारवाई सुरूच आहे, असं  पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं आहे.