लंडन : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नी बेगम कुलसुम नवाज यांचं निधन झालं. 68 वर्षीय कुलसुम नवाज यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरु होते. कुलसुम नवाज व्हेंटिलेटवर होत्या.

पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजचे अध्यक्ष शहबाज शरीफ आणि नवाज शरीफ यांचे पुत्र हुसेन नवाज यांनी कुलसुम यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कुलसुम नवाज यांना घशाचा कॅन्सर होता. त्यांच्यावर जून, 2017 पासून लंडनच्या हार्ले स्ट्रीट क्लिनिकमध्ये उपचार सुरु होते.

उपचारादरम्यानच त्यांच्या फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन झालं होतं. सोमवार रात्रीपर्यंत त्यांची प्रकृती ठीक होती. परंतु आज कुलसुम नवाज यांनी अखेरचा श्वास घेतला.

माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नी कुलसुम नवाज यांचा जन्म 1950 मध्ये झाला होता. 1971 मध्ये दोघांचं लग्न झालं होतं. कुलसुम नवाज यांची मुलगी मरियम नवाज आणि पती नवाज शरीफ सध्या रावळपिंडीमधील तुरुंगात बंद आहेत.